नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर व विमानतळ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोडीच्या दोन स्वतंत्र घटना उघडकीस आल्या असून अज्ञात चोरट्यांनी एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारायण नगर येथे घडली. फिर्यादी शिवलक्ष्मी राजेश सोंडल्लू (वय ३६) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९१/२०२६ नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दुसरी घटना विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हरीओम नगर, तरोडा बुद्रुक येथे घडली. फिर्यादी सचिन किशोर जवळेकर (वय ३३) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ७० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २९९/२०२६ दाखल करण्यात आला आहे.दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीसांकडून तपास सुरू आहे. शहरात वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांनी घर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Post Views: 88
