शालेय, वारकरी, तंत्रज्ञानाचे निःशुल्क शिक्षण:आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश
![]()
माऊली कृपांकित आप्पाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ हे अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात कुऱ्हा बहिरम येथे आहे. हे राज्यातील नामवंत डिजिटल वारकरी ज्ञानपीठापैकी एक तसेच जिल्ह्यातील डिजिटल वारकरी ज्ञानपीठ आहे. ‘त्वं ज्ञानमयो, त्वं विज्ञानमयो, त्वं तंत्रज्ञानमयोसि’ या संकल्पनेवर कार्य करत विद्यार्थ्यांना वारकरी शिक्षण शालेय, शिक्षण आणि तंत्रज्ञानाचे शिक्षणाचे धडे येथे निःशुल्क दिले जात आहे. ज्ञानपीठात पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. या ज्ञानपीठाने वारकरी सांप्रदयातील तज्ञांच्या मार्गदर्शनात वारकरी शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला आहे. तसेच वारकरी शिक्षण देण्यासाठी आळंदी येथील गुरुजी नियुक्त केले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानात समावेश असलेल्या संगणक शास्त्राचा अभ्यासक्रम येथे विद्यार्थ्यांना शिकवला जातो. अध्ययन कक्ष, संगणक कक्ष, वाचनालय, निवास कक्ष आणि भोजन कक्ष असलेली ज्ञानपीठाची अद्ययावत इमारत आहे. योग, शारिरिक व्यायाम, मैदानी व बौद्धिक खेळ, मुलांची सहल, स्नेहसंमेलन, पालक एकत्रिकरण, व्यक्तिमत्व विकास अशा विविध अभ्यासातून आणि कार्यक्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जात आहे. दरवर्षी या ज्ञानपीठामध्ये पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. याही वर्षी विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रवेश नोंदवण्याची अंतिम तारीख ५ जून आहे. विद्यार्थ्यांची निवड ही मुलाखत प्रक्रियेने होणार आहे. दहावीच्या परीक्षेत श्रवण वानखडे या विद्यार्थ्याने ८७.२० टक्के गुण मिळवले. त्याबद्दल वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर भारतीय म्हणाले की, ” वैकुंठवासी आप्पाजी महाराज हे डिजिटल गुरुकुल आहे. इथे संगणक शास्त्रही शिकवले जाते. केवळ अध्यात्मच नव्हे तर ज्ञान व विज्ञान यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी वारकरी ज्ञानपीठ प्रयत्न करत आहे. या वारकरी ज्ञानपीठातील विद्यार्थी श्रवण हा उत्तम गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याचा संस्थेला आनंद आहे. श्रवणने यशाचे श्रेय वडील, संस्थेचे अध्यक्ष सुधीर भारतीय, संस्थेचे सचिव अनंत भारतीय, वारकरी ज्ञानपीठाचे आचार्य लक्ष्मण महाराज लटपटे, गुरुदेव छोगमल मालू शाळेचे मुख्याध्यापक ए. आर. राऊत, वर्ग शिक्षिका अर्चना तायडे, शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले. श्रवण वानखडेदहावीत ज्ञानपीठातून प्रथम वारकरी ज्ञानपीठातील हुशार विद्यार्थी श्रवण वानखडेने कीर्तन, प्रवचन, पखवाज वादन, तबला वादन, हरिपाठ करूनही दहावीत ८७.२० टक्के गुण मिळवले. अन् ज्ञानपीठातून प्रथम क्रमांक पटकावला. येथे विद्यार्थ्यांना राज्यातील वारकरी परंपरेसह, तंत्रज्ञानाचेही नि:शुल्क धडे देत उत्तम नागरिक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. वारकरी परंपरेनुसार श्रीमद भगवत गीतेतील श्लोकांचाही अभ्यास आहे.
