करमाळ्यातील सर्वधर्मीय सामुदायिक सोहळ्यात 25 जोडपी विवाह बंधनात:श्रीराम प्रतिष्ठानतर्फे आयोजन, हजारो वऱ्हाडी मंडळीचा सहभाग
![]()
करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात २५ जोडपी विवाह बंधात अडकली. सनई चौघाड्याच्या गजरात झालेल्या या सोहळ्यास हजारो वऱ्हाडी मंडळीने सहभाग घेतला. वधू वरांना आर्शिवाद देण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी हजेरी लावली. या विवाह सोहळ्याने करमाळा तालुक्याच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. सर्वधर्मीय समाजाला एकत्र आणत सामाजिक समतेचा संदेश देणारा हा सोहळा दिमाखात पार पडला. विवाह सोहळ्यास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन कल्याणशेट्टी , आमदार राजाभाऊ राऊत, आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार आदी उपस्थित होते. महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी श्रीराम प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले. पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांनीही सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा देणारा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे नमूद करत गणेश चिवटे यांचे कौतुक केले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीही शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळ्यादरम्यान संपूर्ण परिसरात आनंद, उत्साह आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी व वऱ्हाडी मंडळी आणि विविध समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते, वधूंना मणी मंगळसूत्र संसारोपयोगी वस्तूंची भेट या विवाह सोहळ्यात सहभागी प्रत्येक वधू-वरांना मणी मंगळसूत्र, जोडवे, बिचवे, हळदीची व लग्नाची संपूर्ण कपडे,संसार उपयोगी साहित्य, ५ भांडी भेट देण्यात आली. तसेच सर्व नवरदेवांना मिरवणुकीसाठी स्वतंत्र घोडा व बॅजो, वऱ्हाळी मंडळींना जेवण, सर्वांना मानाची शिदोरी, प्रशस्त मंडप, स्पिकर, लाईट डेकोरेशन अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून सामाजिक संदेश देण्यात येत आहे. चार वर्षात १०५ जोडप्याचे विवाह लावण्यात आलेले आहेत. गणेश चिवटे, संस्थापक अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठान करमाळा .
