मिरची पिकास नजर लागू नये म्हणून शेतात माणसासारखे हुबेहूब बुजगावणे:साकारलेले हे बुजगावणे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे
![]()
शेतात पिकांचे पाखरांपासून व वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी बुजगावणे उभे करण्याची पद्धत जुनी आहे. भोकरदन तालुक्यातील वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी फकीरबा वाघ यांनी मात्र मिरचीच्या पिकाला कुणाची वाईट नजर लागू नये म्हणून माणसासारखे हुबेहूब दिसणारे बुजगावणे शेतात उभे केले. हे बुजगावणे सध्या पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरले आहे. भोकरदन तालुका मिरची उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. यंदा कडक उन्हाळा असतानाही फकीरबा वाघ यांनी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले. उन्हाळी मिरचीची जोमदार लागवड केली. सध्या मिरचीचे पीक ऐन बहरात आहे. पीक इतके सुंदर दिसते की कुणाचीही नजर लागावी. “मिरचीला कुणाची दृष्ट लागू नये. पीक सुरक्षित राहावे,” या भावनेतून त्यांनी ही शक्कल लढवली. शेतात त्यांनी पँट-शर्ट घातलेले बुजगावणे उभे केले. डोक्याला फेटा बांधला आहे. हातात काठी दिली आहे. लांबून पाहिल्यावर शेतात माणूस उभा असल्याचा भास होतो. बुजगावणे इतके जिवंत वाटते की रस्त्यावरून जाणारे वाहनचालक, पादचारी क्षणभर थांबतात. शेताकडे पाहतात. अनेक जण “शेतकरी भर उन्हात असा का उभा आहे?” हे पाहण्यासाठी शेतात डोकावतात. तेव्हा ते बुजगावणे असल्याचे समजते. ही अनोखी सिक्युरिटी सिस्टीम पाहून अनेक जण कौतुक करत आहेत. या भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरचीचे उत्पादन घेतात. यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. तरीही शेतकऱ्यांनी जिद्दीने उन्हाळी मिरचीची लागवड केली. ठिबक सिंचन केले. उपलब्ध विहिरीच्या पाण्याचे नियोजन केले. मिरची वाचवली. बाजारपेठेत मिरचीला चांग ले भाव मिळत आहेत. हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. कष्टाने फुलवलेले पीक सुरक्षित राहावे, हाच वाघ यांचा उद्देश आहे. ग्रामीण भागात पिकाला नजर लागते अशी जुनी समजूत आहे. नजर उतारा म्हणून काळी बाहुली, टायर लावले जातात. फकीरबा वाघ यांनी त्याला आधुनिक कल्पकतेची जोड दिली. त्यांच्या मते यामुळे नजर टळते. रात्री वन्यप्राण्यांनाही शेतात माणूस असल्याचे वाटते. ते पिकाचे नुकसान करण्यापासून लांब राहतात. जुन्या कपड्यांचा वापर करून माणसाच्या उंचीचे हे बुजगावणे तयार केले आहे. लढवलेली शक्कल फायद्याची कष्टाने फुलवलेल्या मिरचीच्या शेताचे रक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने लढवलेली ही शक्कल सध्या सोशल मीडियावरही चांगलीच व्हायरल होत आहे. भोकरदनच्या या ”माणूस-बुजगावण्या” ने तंत्रज्ञानाच्या युगातही पारंपरिक समजुतींना कल्पकतेची जोड कशी देता येते, हे दाखवून दिले आहे. कष्टाचे चीज झाले: शेतकरी वाघ दिवसभर उन्हात राबून मिरचीचे पीक उभे केले आहे. हे पीक पाहून अनेकांना अप्रूप वाटते. कुणाची दृष्ट लागून पिकाचे नुकसान होऊ नये, यासाठी मी हे बुजगावणे लावले आहे. लोक थांबून ते पाहतात. तेव्हा माझ्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते. फकीरबा वाघ, शेतकरी वरूड बु.
