केंद्राची बंदी असताना नागपुरात दिला "तिहेरी तलाक':मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ; तहसील पोलिसांत पतीसह सासूवर गुन्हा
![]()
देशात ‘तिहेरी तलाक’ प्रथा कायद्याने गुन्हा ठरवूनही नागपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगी जन्माला आल्याच्या कारणावरून एका विवाहितेचा छळ करून तिला पतीने तोंडी तिहेरी तलाक दिला. या प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी पती इमरान रशीद शेख (वय 38) आणि सासू सईदा बेगम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रुक्सार शेख सोहेल शेख (वय 32) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा विवाह 31 मे 2024 रोजी इमरानसोबत मुस्लिम पद्धतीने पार पडला होता. पीडितेचे हे पहिले, तर इमरानचे हे दुसरे लग्न होते. सुरुवातीचे काही महिने सुखाचे गेल्यानंतर, पीडितेने एका मुलीला जन्म दिला. मात्र, मुलगी झाल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी पती आणि सासूने पीडितेला टोमणे मारत तिचा मानसिक व शारीरिक छळ सुरू केला. तक्रारीनुसार, 24 एप्रिल रोजी पतीने केलेल्या मारहाणी प्रकरणी महिलेने आधीच पोलिसांत तक्रार केली होती. तरीही छळ थांबला नाही. काही दिवसांपूर्वी पतीने पुन्हा मारहाण करून तिला तोंडी ‘तिहेरी तलाक’ दिल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. विशेष म्हणजे, मारहाण होत असताना पतीचा मित्र तिथे उपस्थित होता, परंतु त्याने पीडितेला कोणतीही मदत केली नाही. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि ‘मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा 2019’ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी भा. न्या. सं. च्या कलम 85, 115 (1), 118 (1), 296, 352, 351 (3), 3 (5) नुसार आणि द मुस्लिम वुमन्स (प्रोटेक्शन ऑफ राईट ऑन मॅरेज) ॲक्ट 2019 च्या कलम 3 व 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तात्काळ अटकेची गरज नाही. 60 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करावे लागते, त्यानंतर न्यायालय शिक्षा ठोठावते. यात तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. केंद्र सरकारने 2019 मध्ये संमत केलेल्या कायद्यानुसार ‘तत्काळ तिहेरी तलाक’ संदर्भात खालील तरतुदी आहेत: तोंडी, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिलेला तिहेरी तलाक अवैध असून, यासाठी पतीला 3 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते.
