नागपुरात 'पूर्ती' संस्थेचा रौप्य महोत्सव, गडकरींच्या मार्गदर्शनाखाली:आमिर खान, नाना पाटेकर 'जलसंवाद' अन् 'जलक्रांती परिषदेत' होणार सहभागी
![]()
गेल्या अडीच दशकांपासून जलसंधारणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे’चा रौप्य महोत्सवी सोहळा 17 आणि 18 मे 2026 रोजी नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या दोन दिवसीय कार्यक्रमात ‘जलसंवाद’ आणि ‘जलक्रांती परिषद’ आयोजित केली आहे. यात चित्रपट अभिनेते नाना पाटेकर आणि आमिर खान यांच्यासह देशभरातील जलतज्ज्ञ सहभागी होणार आहेत. संस्थेने विकसित केलेल्या ‘तामसवाडा मॉडेल’ची आज देशभरात चर्चा आहे. या यशस्वी प्रवासाचे औचित्य साधून 17 मे रोजी सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘नागपूर जलसंवाद-2026’ पार पडेल. ‘शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण’ या विषयावर पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी, पद्मश्री उमाशंकर पांडे आणि पद्मश्री सेठपाल सिंग मार्गदर्शन करतील. या संवादात विदर्भातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संशोधक आपले विचार मांडणार आहेत. संस्थेच्या 25 वर्षांच्या कार्याचा आढावा आणि भविष्यातील जलसुरक्षेची दिशा या परिषदेतून स्पष्ट होईल. सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, 18 मे रोजी रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘जलक्रांती परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. ‘पाणी फाउंडेशन’चे संस्थापक आमिर खान, ‘नाम फाउंडेशन’चे अध्यक्ष नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची या परिषदेला प्रमुख उपस्थिती असेल. या परिषदेत जलसंधारणाच्या कामात सामाजिक संस्थांचा सहभाग आणि विदर्भातील ग्रामीण भागाचा कायापालट यावर सविस्तर चर्चा होईल. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भूषवतील. राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड आणि विविध विद्यापीठांचे कुलगुरूही यावेळी उपस्थित राहतील. ‘जलपर्व’, ‘जलक्रांती’, ‘कृषिकल्याण’ आणि ‘कॉरिडॉर्स ऑफ वॉटर सिक्योरिटी’ या चार महत्त्वपूर्ण पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते केले जाईल. संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्लदत्त जामदार आणि सचिव माधव कोटस्थाने यांनी विदर्भातील शेतकरी, सरपंच आणि नागरिकांना या जल-अभियानात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ‘नागपूर जलसंवाद’ 17 मे रोजी दुपारी 4:00 वाजता देशपांडे सभागृहात, तर ‘जलक्रांती परिषद’ 18 मे रोजी सकाळी 10:00 वाजता सुरेश भट सभागृहात होईल.
