नाशिकमध्ये मध्यस्थी करणे जीवावर बेतले:सलून व्यावसायिकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या, आरोपी लिफ्ट घेऊन फरार
![]()
नाशिकमधील पंचवटी परिसरातील आडगाव नाका येथे शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास एका सराईत मद्यपी गुन्हेगाराने किरकोळ वादातून सलून व्यावसायिक जयवंत यशवंत पवार (45) यांची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. मधुर मिलन स्वीट्ससमोर घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. जुन्या नाशिकमधील रहिवासी आणि अमरधाम रोडवरील तन्मय मेन्स पार्लरचे मालक जयवंत पवार शुक्रवारी रात्री मित्र विनोद आगळे यांच्यासोबत बाहेर गेले असताना, पहाटे 3:30 च्या सुमारास आडगाव नाका येथे ही घटना घडली. एका टायर पंक्चरच्या दुकानाजवळ दारू पीत बसलेला संशयित आरोपी राजा काकवीपुरे आणि विनोद आगळे यांच्यात किरकोळ कारणावरून शाब्दिक चकमक झाली. यावेळी मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जयवंत पवार यांच्याशीच संतापलेल्या आरोपीने झटापट सुरू केली. आरोपी लिफ्ट घेऊन पसार झटापटीदरम्यान संशयित आरोपी राजा काकवीपुरे याने आपल्या बुटात लपवून ठेवलेला धारदार चाकू काढून जयवंत पवार यांच्यावर हल्ला केला. पहिला वार हुकल्यानंतर त्याने केलेला दुसरा वार थेट पवार यांच्या छातीत वर्मी बसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या कृत्यानंतर आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली आणि एका दुचाकीस्वाराला धमकावून त्याच्या गाडीवर ‘लिफ्ट’ घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला. जखमी अवस्थेत जयवंत पवार यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि वृद्ध आई असा परिवार असून, या भीषण घटनेमुळे संपूर्ण पवार कुटुंबावर शोककळा पसरली आहे. पोलिसांचा धाक कमी झालाय का? घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील व त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून, मयत जयवंत यांच्या पत्नी गीता पवार यांच्या फिर्यादीवरून संशयित राजा काकवीपुरे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार आरोपीचा कसून शोध घेत आहेत. मात्र शहराच्या गजबजलेल्या मुख्य नाक्यावर ही रक्तरंजित घटना घडल्यामुळे सराईत गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झाला आहे का, असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे.
