ज्येष्ठ कार्यकर्त्या शांताबाई साठे काळाच्या पडद्याआड:अण्णाभाऊंच्या कन्या आणि विचारांचा अखेरचा स्वाभिमानी आवाज हरपला

0
730-x-548-new-2026-05-09t152815253_1778321626.jpg




लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या आणि कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या कॉम्रेड शांताबाई साठे (दोडके) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कांदिवली येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा जपणारा एक महत्त्वाचा दुवा तुटल्याची भावना सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. शांताबाई अविवाहित होत्या. त्यांच्या पश्चात धाकटी बहीण शकुंतला, भाचे, भाची आणि नातवंडे असा परिवार आहे. शांताबाई या अण्णाभाऊ साठे यांच्या पत्नी कॉम्रेड जयवंताबाई यांच्या कन्या होत्या. लहानपणापासूनच त्यांच्यावर डाव्या विचारसरणीचे संस्कार झाले होते. बालवयातच त्यांनी बाल संघ आणि तत्कालीन लाल बावटा कला पथकात सक्रिय सहभाग घेतला. सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे काम केले. त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले होते. 1949 च्या काळात कम्युनिस्ट पक्षावर मोठ्या प्रमाणावर दडपशाही सुरू असताना शांताबाईंनाही त्याचा फटका बसला होता. त्या काळात त्यांनी काही महिने तुरुंगवास भोगला. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत कठीण असल्याने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी औषध निर्मिती कंपनीत नोकरी स्वीकारली. नोकरी करत असतानाच त्या कामगार संघटनांच्या कामातही सक्रिय राहिल्या. कामगार चळवळ आणि सामाजिक बांधिलकी यामध्ये त्यांनी आयुष्यभर सातत्य राखले. शांताबाईंच्या स्वभावात माणुसकी आणि कुटुंबाविषयीचा जिव्हाळा विशेष होता. स्वतःच्या मर्यादित पगारातून त्या दर महिन्याला वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या पहिल्या पत्नी कोंडाबाईंना आर्थिक मदत पाठवत असत. अण्णाभाऊंच्या पहिल्या कुटुंबाशी, विशेषतः मुलगा मधुकर यांच्याशी त्यांचे अत्यंत आत्मीय संबंध होते. आर्थिक अडचणी असूनही त्यांनी कधीही कुटुंबापासून किंवा सामाजिक जबाबदाऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवले नाही. साहित्य आणि रंगभूमीशीही शांताबाईंचे अतूट नाते होते. अण्णाभाऊ साठे यांच्या कथा, कादंबऱ्या आणि लोकनाट्यांच्या त्या पहिल्या वाचक मानल्या जात होत्या. शाहीर अमर शेख आणि शाहीर दत्ता गव्हाणकर यांच्या कलापथकात त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. सत्तरच्या दशकात ‘काय चाललंय गं’ या लोकनाट्यात त्यांनी अभिनय केला होता. तसेच 1986 मध्ये ‘लोकमंच’ संस्थेच्या गाजलेल्या ‘अकलेची गोष्ट’ या लोकनाट्यात त्यांनी अभिनयासोबत दिग्दर्शन सहाय्यक म्हणूनही काम पाहिले होते. पेन्शन मिळवण्यासाठी शांताबाईंना मोठा संघर्ष उतारवयात कलाकार पेन्शन मिळवण्यासाठी शांताबाईंना मोठा संघर्ष करावा लागला. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. शासनाकडे कधीही खुशामत न करता त्यांनी स्वाभिमानाने आयुष्य जगले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कन्या असूनही समाजाकडून अपेक्षित सन्मान मिळाला नाही, याची खंत त्यांना कायम होती. तरीदेखील त्यांनी कष्टकरी, कामगार आणि सामाजिक चळवळीशी असलेली आपली बांधिलकी शेवटच्या श्वासापर्यंत जपली. त्यांच्या निधनाने एका स्वाभिमानी आणि संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचा अंत झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed