पुण्यातील उद्योजक केपीआयटीचे संस्थापक डॉ. रवी पंडित यांचे निधन:उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली
![]()
भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि ‘के अँड पी’ समूहाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. ऊर्फ रवी पंडित यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगा चिन्मय, मुलगी प्राची आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. डॉ. रवी पंडित यांनी गेल्या तीन दशकांत जागतिक दर्जाच्या संस्था उभ्या केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली केपीआयटी टेक्नॉलॉजीजने जगभरातील १५ देशांमध्ये ऑटोमोटिव्ह इंजिनीअरिंग आणि सॉफ्टवेअर क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. विशेषतः इलेक्ट्रिक वाहने आणि ‘क्लीन एनर्जी’ तंत्रज्ञानात त्यांनी भारताचे नाव उज्ज्वल केले. याशिवाय, ‘कीर्तने आणि पंडित’ या नामांकित चार्टर्ड अकाउंटन्सी फर्मचे अध्यक्ष म्हणून त्यांनी १२ हजारांहून अधिक तज्ज्ञांचे नेतृत्व केले. व्यवसायापलीकडे जाऊन डॉ. पंडित यांनी सामाजिक आणि शाश्वत विकासासाठी मोठे कार्य केले. त्यांनी ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’ आणि ‘जनवाणी’ या संस्थांच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच गोखले इन्स्टिट्यूटमधील ‘सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ला त्यांनी मोठे पाठबळ दिले. केंद्र सरकारच्या ‘नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन’च्या उच्चाधिकार समितीवर असलेले ते खाजगी क्षेत्रातील एकमेव सदस्य होते. ‘हृदय’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी कृषी आणि ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला. डॉ. पंडित हे अमेरिकेतील एमआयटीचे माजी विद्यार्थी आणि सुवर्णपदक विजेते चार्टर्ड अकाउंटंट होते. त्यांना विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट देऊन गौरवले होते. ‘इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी’चे फेलो म्हणून त्यांची निवड झाली होती. त्यांनी लिहिलेले ‘लिपफ्रॉगिंग टू पोल-वॉल्टिंग’ हे पुस्तक विशेष गाजले. ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष, थरमॅक्स आणि वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणूनही त्यांनी मोलाची जबाबदारी सांभाळली होती.
