Sunetra Pawar CM? Supriya Sules Statement Sparks 2029 Political Buzz
![]()
सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मी घालेन, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व
.
जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा बारामतीतील अनेक कार्यकर्त्यांची असल्याचे म्हटले होते. या विधानानंतर राज्यभरात राजकीय चर्चा रंगल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी अत्यंत संयत भूमिका घेतली. त्या म्हणाल्या, सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मी घालेन. तसेच 2029 मध्ये कोण कोणत्या पक्षात असेल, हे त्या वेळेलाच स्पष्ट होईल, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या ऑपरेशन तुतारी, या मुद्द्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले. मी निवडून आल्यापासून ऑपरेशन तुतारीच्या चर्चा ऐकत आहे. अनेक वर्षांपासून या गोष्टी सुरू आहेत. आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत. आमची कोणतीही भानगड नाही. लोकांनी आम्हाला संधी दिली आहे आणि त्या विश्वासाचा मान ठेवून आम्ही काम करत आहोत, असे त्या म्हणाल्या. सत्तेत असो किंवा नसो, लोकांसाठी काम सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणात तोडाफोडीच्या घडामोडींवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी अशा राजकारणात आता काही नवीन राहिले नसल्याचे म्हटले. तोडून-फोडून सत्ता मिळवण्याच्या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. लोकांना विकास आणि काम हवे आहे, असे त्या म्हणाल्या. तसेच जनतेने दिलेल्या संधीचा आदर करत सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी राज्य सरकारवर विविध प्रश्नांवरून जोरदार टीकाही केली. कांद्याच्या घसरलेल्या दरांमुळे शेतकरी अडचणीत असल्याचे सांगत त्यांनी अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसत असल्याकडे लक्ष वेधले. शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे त्या म्हणाल्या. युद्धजन्य परिस्थितीमुळे युरियाचा तुटवडा निर्माण होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. सरकारने या प्रश्नांवर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ काढणार का?
पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांनी त्या वेळी सर्वप्रथम हा देशावरील हल्ला असल्याचे म्हटले होते. आम्ही राजकारण बाजूला ठेवून सरकारसोबत उभे राहिलो. आमच्यासाठी आधी देश, मग राज्य, त्यानंतर पक्ष आणि शेवटी कुटुंब, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याचवेळी सरकारमधील अंतर्गत संघर्षांवर टीका करत त्यांनी सवाल केला की, मंत्र्यांनाच नोटिसा देणारे आणि धक्काबुक्की करणारे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ काढणार का? त्यांच्या या प्रश्नामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
