बर्ड बीएनबी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद:कृत्रिम घरटी, झाडांचे संवर्धन अन् पक्ष्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे काळाची गरज – डॉ. दिलीप यार्दी
![]()
शहरी भागात पक्ष्यांसाठी सुरक्षित घरटी निर्माण करणे ही काळाची गरज असून, नागरिकांनी पक्षीसंवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ व ईआरएफईए (Environmental Research Foundation Educational Academy) चे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी यांनी केले. ईआरएफईए आणि वँडर अँड पॉझ (Wander Pause) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बर्ड बीएनबी’ कृत्रिम पक्षीघरटे निर्मिती कार्यशाळेत ते बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या या कार्यशाळेला निसर्गप्रेमी नागरिक, लहान मुले, युवक आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शास्त्रीनगर येथील सभागृहात आयोजित या उपक्रमासाठी निसर्ग आणि पक्ष्यांवरील आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी बोलतांना डॉ. यार्दी आणि त्यांच्या टीमने पक्ष्यांच्या प्रजनन काळात निर्माण होणाऱ्या अडचणी, शहरीकरणामुळे कमी होत चाललेल्या नैसर्गिक घरट्यांच्या जागा आणि कृत्रिम घरट्यांचे महत्त्व याविषयी माहिती दिली. उन्हाळ्यात मार्च-एप्रिलपासून पक्ष्यांचा प्रजनन हंगाम सुरू होतो. मात्र, शहरांमध्ये झाडांची कमतरता आणि सुरक्षित जागांचा अभाव यामुळे अनेक पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी अडचणी येतात. अशा परिस्थितीत कृत्रिम घरटी त्यांना मोठा आधार ठरतात, असे त्यांनी सांगितले. डॉ. दिलीप यार्दी म्हणाले, “गेल्या तीन-चार वर्षांच्या निरीक्षणातून या घरट्यांची रचना विकसित करण्यात आली आहे. मोठे पक्षी किंवा कबुतरे आत जाऊ नयेत, यासाठी त्याची विशेष रचना करण्यात आली आहे. शहरी भागात पक्ष्यांसाठी नैसर्गिक जागा उरलेल्या नाहीत. त्यामुळे कृत्रिम घरटी आणि वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक बनले आहे.” कार्यशाळेदरम्यान सहभागी नागरिकांनी लाकूड आणि प्लायवूडपासून स्वतः कृत्रिम घरटी तयार केली. खिळे ठोकण्यापासून रंगकामापर्यंत प्रत्येक टप्प्यात सहभागींचा उत्साह पाहायला मिळाला. विशेषतः मुलांनी आकर्षक रंगसंगतीतून घरट्यांना सुंदर रूप दिले. एकूण ४५ सहभागी मिळून २१ कृत्रिम घरटी तयार करण्यात आली. वँडर अँड पॉझ संस्थेने कार्यशाळेचे नियोजन केले होते. स्वयंसेवक कलाकार युगा आणि दिशिता यांनी तयार केलेला विशेष ‘सेल्फी पॉईंट’ सहभागींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. तसेच डॉ. यार्दी यांच्या स्वाक्षरीसह पक्ष्यांवरील हस्तचित्रे आणि ‘बर्ड पासपोर्ट’ स्वरूपातील माहितीपत्रक सहभागीांना भेट देण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात ईआरएफईएचे स्वयंसेवक श्रवण परळीकर, लालासाहेब चौधरी आणि कुणाल विभांडिक यांचे विशेष योगदान राहिले. कार्यशाळेनंतर सहभागींकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटल्या. “सर्जनशीलता आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला,” अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. काही सहभागीांनी भविष्यात पक्ष्यांसाठी ‘बर्ड वॉक’सारखे उपक्रम आयोजित करण्याची इच्छाही व्यक्त केली. समारोपावेळी डॉ. यार्दी यांनी सांगितले, “पक्षी आणि झाडे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये पर्यावरण आणि पक्षीसंवर्धनाविषयी संवेदनशीलता वाढते. निसर्गाशी जोडलेले राहणे हीच खरी जीवनशैली आहे.”
