इम्तियाज जलील यांच्याकडून निदा खानची पाठराखण:पोलिसांना सहकार्य करणार; संजय शिरसाटांना काडीचा भाव देणार नसल्याचा टोला

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-08t14_1778230548.png




एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिची पाठराखण केली. प्रस्तुत प्रकरणातील मुलीने आम्हाला संपूर्ण वस्तुस्थिती सांगितली. मी स्वतः एफआयआर वाचला. त्यात विशेष असे काहीच नाही. मी यापूर्वीच सदर तरुणीला तुझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मी तुझ्यासोबत उभा राहणार नाही असे सांगितले आहे. पण या प्रकरणात तिने जे सांगितले त्यानुसार सर्वकाही झाले असेल, तर मी तिच्यासोबत प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने उभा राहीन, असे ते म्हणालेत. जलील यांनी यावेळी मंत्री संजय शिरसाट यांना आपण काडीचाही भाव देत नसल्याचेही निक्षुण सांगितले. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. ती एमआयएमच्या एका स्थानिक नगरसेवकाने खरेदी केलेल्या घरात राहत होती. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणाचा संबंध थेट इम्तियाज जलील यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पत्रकारांनी जलील यांना छेडले असता आपण मंत्री संजय शिरसाट यांच्या आरोपांना काडीमात्र भाव देत नसल्याचे नमूद करत प्रस्तुत प्रकरणात आपण पोलिसांना सहकार्य करत असल्याचे स्पष्ट् केले. आरोप झाला म्हणजे कुणीही दोषी होत नाही इम्तियाज जलील म्हणाले, एखाद्या व्यक्तीवर आरोप झाल्यानंतर ती व्यक्ती त्याच्यावरील आरोप कोर्टात सिद्ध होईपर्यंत निर्दोष असते. हा कायद्याचा नियम आहे. म्हणजे माझ्यावर कुणीतरी आरोप केला, तर मी दोषी किंवा गुन्हेगार ठरत नाही. अशा प्रकारचे आरोप होतच असतात. पण मला विश्वास आहे की, या प्रकरणात नाशिक पोलिस नियमाप्रमाणे करतील. सदर तरुणीला (निदा खान) किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला कोर्टात जाऊन जामीन मागण्याचा अधिकार आहे. ही कायदेशीर तरतूद आहे. जामीन याचिका सेशन कोर्टात रिजेक्ट झाली, तरीही व्यक्ती दोषी ठरत नाही. त्याच्याकडे वरच्या कोर्टात जाण्याचा अधिकार असतो. पण दुर्दैवाने या देशात सध्या मीडिया ट्रायल सुरू झाली आहे. मीडिया ट्रायलमुळे अनेक लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मी भेटलो नाही, तर माझे घर व माझ्या गाड्यांची शुटिंग केली जाते. माध्यमांनी असे करू नये. माझा न्यायप्रणालीवर विश्वास आहे. नाशिक पोलिस योग्य ती कारवाई करतील. पण या प्रकरणी मीडिया ट्रायल चालवता कामा नये. पालकमंत्री स्वतः पोलिस आहेत का? इम्तियाज जलील यावेळी संजय शिरसाट यांच्यावर हल्ला चढवत म्हणाले, आमच्यावर कुणीही उठसूठ आरोप करत आहे. आता आम्ही अडचणीत सापडल्याचे त्यांना वाटत असेल. पण आरोप करणाऱ्यांवर यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांना तेव्हाच एवढी चिड येण्याची गरज होती. त्यावेळीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची गरज होती. उच्चस्तरीय चौकशीची मागणी करण्याची गरज होती. पण त्यांनी असे काहीही केले नाही. आता एक मुलगी कुठेतरी आमच्या शहरात सापडली. त्यानंतर त्याचा थेट माझ्याशी जोडला गेला. या प्रकरणी पोलिसांना तपासासाठी वेळ दिला गेला पाहिजे. पोलिस मला जे प्रश्न विचारायचे ते विचारतील. काय कारवाई करायची ते करतील. पण मीडिया कोणत्याही व्यक्तीकडे जाऊन त्याची प्रतिक्रिया घेत आहेत. ते लोक काय तपास अधिकारी आहेत का? तुम्ही पोलिसांकडे गेले पाहिजे. पोलिस जिल्ह्याचे पालकमंत्री (संजय शिरसाट) यांच्या माध्यमातून मला प्रश्न विचारणार आहेत का? पालकमंत्री स्वतः पोलिस आहेत का? पालकमंत्री राजकारण करत असतील तर माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही, असे ते म्हणाले. निदा खानविरोधात NBW जारी झाला आहे का? इम्तियाज जलील यावेळी निदा खानची बाजू घेत म्हणाले, सदर मुलीविरोधात एखादा अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी झाला आहे का? लुकआऊट नोटीस जारी झाली आहे काय? केवळ आरोप झालेत. हे प्रकरण एवढे गंभीर असते किंवा तिने एखादा खून केला असता अथवा तिचा एखाद्या अतिरेकी कृत्यात हात असता, तर पोलिसांनी स्वतः अजामीनपात्र वॉरंट जारी केला असता. लुकआऊट नोटीस जारी केली असती. पण या प्रकरणात केवळ एका एफआयआरमध्ये तिचे नाव आले आहे. त्या एफआयआरमध्ये कम्युनल हेट्रेट, हर्टिंग रिलिजस सेंटिमेंटचा आरोप तिच्यावर आहे. पण या प्रकरणात तिने खूप मोठा दरोडा घातल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. खूप मोठ्या लोकांची हत्या केली आहे किंवा तिने एखादे अतिरेकी कृत्य केल्याचे भासवले जात आहे. मतीन पटेल यांच्यावर भाष्य करणे टाळले इम्तियाज जलील यांनी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यावर थेट बोलणे टाळले. ते म्हणाले, पोलिसांनी एफआयआर दाखल केला असेल, तर ते नियमानुसार कारवाई करतील. एफआयआर दाखल झाला म्हणजे त्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. आता मी पोलिसांना त्यांचा या प्रकरणात काय रोल आहे याची विचारणा करेल. पण पालकमंत्री म्हणून आमच्यावर कुणीही आरोप करू नये. मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही. मला पोलिस आयुक्त व नाशिक पोलिस प्रश्न विचारतील. मी त्यांना सहकार्य करेल. मी आजही या प्रकरणातील आरोपींची बाजू घेईल. माझ्या भूमिकेत कोणताही बदल झाला नाही. अटक करण्यात आलेल्या मुलींना आम्हाला संपूर्ण परिस्थिती सांगितली. आम्ही स्वतः एफआयआर वाचला. त्यात विशेष असे काहीही नाही. त्या मुलीला मी यापूर्वीच स्पष्ट सांगितले आहे की, तुझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मी तुझ्यासोबत उभा राहणार नाही. या प्रकरणात तिने सांगितल्यानुसारच झाले असेल, तर मी तिच्यासोबत प्रामाणिकपणे पूर्ण ताकदीने उभा राहीन. तिला न्याय मिळेल असा मला विश्वास आहे, असे जलील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed