Nida Khan Arrested | निदा खानला लपवणाऱ्या MIM नगरसेवकावर गु्न्हा; मतीन पटेलवर अटकेची टांगती तलवार
Nida Khan Arrested | नाशिकमधील एका बहुराष्ट्रीय आयटी (IT) कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिला पोलिसांनी अटक केली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्तरीत्या अत्यंत गुप्तपणे राबवलेल्या मोहिमेत तिला नरेगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले. निदा खान ही गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देऊन लपून बसली होती.
सिनेस्टाईल अटक आणि पोलिसांची रणनीती
अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानचा पोलीस युद्धपातळीवर शोध घेत होते. ती वारंवार आपली ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर निदा खान ही छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मधील नरेगाव (Naregaon) येथे एका फ्लॅटमध्ये लपल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार, साध्या वेशातील पोलिसांनी विनाचिन्हांकित वाहनांचा वापर करून नरेगाव परिसराची नाकेबंदी केली. आरोपीला पळून जाण्याची कोणतीही संधी न देता पोलिसांनी एका नियोजित छाप्यात तिला जेरबंद केले. नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) ही कारवाई यशस्वी केली असून, आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.
एमआयएम नगरसेवकावर गुन्हा दाखल
या प्रकरणात निदा खानला आश्रय दिल्याबद्दल एमआयएम (MIM) पक्षाचे स्थानिक नगरसेवक मतीन पटेल (Matin Patel) यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात मतीन पटेल यांनी गुन्हेगाराला मदत केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे.
नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी या कारवाईबाबत अधिकृत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, देवळाली कॅम्प (Deolali Camp) पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या गुन्ह्यात निदा खानचा जामीन फेटाळला गेला होता. त्यानंतर नगरसेवक मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर बीएनएस कलम २४९ (BNS Section 249) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार (Pravin Pawar) यांच्या सहकार्याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
News Title: Nida Khan Arrested in Sambhajinagar IT Conversion Case Matin Patel
