![]()
बच्चू कडू यांना दोन्ही शिवसेना एकत्र याव्या असे वाटत असेल हे विधान करण्यापूर्वी कडू यांनी एकनाथ शिंदे यांची परवानगी घेतली आहे का? दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात असे जर एकनाथ शिंदे यांना वाटत असेल तर त्यासाठी आम्ही देखील पुढाकार घेऊ, आमचीदेखील दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी आहे. पण बच्चू कडू यांनी असे विधान करण्यापूर्वी शिंदेंची परवानगी घेतली का हे स्पष्ट करावे, त्यांची परवानगी असेल तर आम्ही सुद्धा दोन्ही शिवसेना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करू, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, विधानसभेतील शोकप्रस्तावाच्या वाचनावेळी झालेल्या चुकीबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहात जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली आहे. छोटा फॉन्ट आणि मुद्रणातील त्रुटीमुळे ही चूक झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र रोजच्या पत्रकार परिषदांमधून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणारे संजय राऊत स्वतःच्या वर्तनाबद्दल कधी दिलगिरी व्यक्त करणार? असा सवाल बन यांनी केला आहे. मुंबईतील पावसावरून भाजपचा ठाकरेंना टोमणा नवनाथ बन म्हणाले की, कालपासून मुंबईमध्ये पाऊस पडत आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनपा खबरदारी घेत आहे. मुंबईत निश्चितच पाणी साचले आहे, पण पाणी साचले म्हणून आम्ही घरात बसणारे लोकं नाहीत. आमच्या महापौर रितू तावडे या सकाळपासूनच मुंबईच्या रस्त्यावर फिरून आढावा घेत आहेत, ज्या भागात पाणी साचले आहे तिथे पुढे पाणी साचणार नाही यासाठी सूचना मनपा प्रशासनाला दिल्या आहेत. आम्ही घरी बसणारे लोकं नाहीत आम्ही जनतेसाठी रस्त्यावर उतरत काम करत आहोत. संजय राऊत मुख्यमंत्री तुमच्यासारखे घरात बसून काम करत नाहीत. मातोश्रीवर बसून अडीच वर्षे कारभार करणारे आमचे मुख्यमंत्री नाहीत. आमचे नेते या परिस्थितीचा आढावा घेत आहे. पाऊस जास्त झाल्याने पाणी साचले आहे, पण ते का साचले याकडे आमचे लक्ष आहे. आम्ही केवळ पत्रकार परिषद घेत नाही तर रस्त्यावर उतरून काम करतो. राऊतांनी आधी उरलेला पक्ष वाचवावा नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी इतर पक्षांबाबत चिंता व्यक्त करण्यापूर्वी आपल्या पक्षातील वाढती अस्वस्थता आणि नेत्यांचे होणारे पलायन याकडे लक्ष द्यावे. आधीच अनेक नेते आणि खासदार पक्ष सोडून गेले आहेत. येत्या काळात आमदार आणि नगरसेवक टिकवण्याचेही मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहणार आहे. रोज सकाळी पत्रकार परिषद घेऊन खोटे आरोप करणे आणि विरोधकांवर वैयक्तिक टीका करणे यापलीकडे त्यांच्याकडे कोणताही राजकीय अजेंडा उरलेला दिसत नाही. मराठीची लिपी देवनागरी की रोमन? नवनाथ बन म्हणाले की, मराठी भाषेबाबत बोलताना संजय राऊत यांनी रोमन लिपीचा उल्लेख केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मराठीची अधिकृत लिपी देवनागरी असताना अशा प्रकारची विधाने करून ते मराठी भाषेच्या ज्ञानाचा आव आणत आहेत. दुसरीकडे, पत्रकार परिषदांमध्ये सातत्याने अश्लील भाषा वापरणे, वैयक्तिक टीका करणे आणि सभ्य राजकीय संवादाची पातळी खालावणे हेच मराठी भाषेचा खरा अपमान असल्याची टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. राहुल नार्वेकर यांनी चूक मान्य करून दिलगिरी व्यक्त केली, पण मराठी भाषेत शिवीगाळ केल्याबद्दल संजय राऊत कधी माफी मागणार, असेही बन यांनी म्हटले आहे.
शिवसेना एकत्रिकरणाच्या विधानापूर्वी बच्चू कडूंनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली का?:शिंदेंची संमती असेल तर दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी आम्हीही प्रयत्न करू- भाजप
