नकारात्मकता सोडा अन् आत्मविश्वासाने प्रगती साधा:हिवरेझरे येथील कार्यक्रमात उपस्थितांना व्याख्याते गणेश शिंदेंकडून यशाचा कानमंत्र
![]()
“आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ कष्ट उपसून चालणार नाही, तर तुमच्याकडे कामाप्रती सकारात्मक दृष्टिकोन आणि अढळ आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. ज्यावेळी कर्मचारी संस्थेला स्वतःचे कुटुंब मानून काम करतो, तेव्हा त्या संस्थेची प्रगती कोणीही रोखू शकत नाही,” असे प्रेरणादायी उद्गार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे यांनी काढले. विंटेज हिल्स रिसॉर्ट (हिवरेझरे) येथे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट आणि चैतन्य उद्योग समूहाच्या वतीने आयोजित ‘चैतन्य स्नेहमेळाव्या’त ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या मेळाव्याला महाराष्ट्रातील विविध शाखांमधील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले, त्यामुळे कार्यक्रमाला आपलेपणाची आणि आनंदाची वेगळीच उंची लाभली. या सोहळ्याला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे, चेअरमन सायली वाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना गावडे यांसह मान्यवर उपस्थित होते. शिंदे यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “बँकिंग आणि सहकार क्षेत्रात काम करताना अनेक आव्हाने येतात, पण त्या आव्हानांना संधी मानून पुढे जाणे हाच यशाचा मार्ग आहे. तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा आणि संस्थेच्या ध्येयाशी एकरूप व्हा.” त्यांच्या या ऊर्जादायी व्याख्यानाने उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला होता. शिंदे यांच्या हस्ते संस्थेतील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत, अशा पुरस्कारांमुळे कामाची ऊर्जा द्विगुणित होते, असे नमूद केले. संस्थेच्या चेअरमन सायली शुभम वाडगे यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत भविष्याबद्दल दृढ विश्वास व्यक्त केला. तर संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वाडगे यांनी संस्थेच्या संघर्षमय प्रवासाचा भावनिक आढावा घेत, संस्था ही आपल्या आईप्रमाणे आहे – तिचे जतन करा आणि प्रामाणिकपणे कार्य करा, असे संस्थेतील सर्व उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना सांगितले. गणेश शिंदे यांच्या प्रभावी मांडणीमुळे हा स्नेहमेळावा कर्मचाऱ्यांसाठी केवळ करमणूक न ठरता एक प्रबोधनाचा ठेवा ठरला. सायंकाळी आदेश जाधव व रेणुका पवार यांच्या सुमधुर संगीत संध्येमुळे कार्यक्रमाची सांगता रंगतदार वातावरणात झाली. सूत्रसंचालन चेतन गायकवाड यांनी, तर आभार अनिल गावडे यांनी मानले.
