निषेध:50 रुपये भाव पुकारल्याने आंदोलन; नंतर तो कांदा 175 दराने खरेदी, सटाणा बाजार समिती प्रवेशद्वारासमोर कांदा फेकून देण्याचा पवित्रा
![]()
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्याला अवघा ५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्याने संताप व्यक्त करीत अन्यायकारक दराच्या निषेधार्थ बाजार समिती कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर मध्यस्थी करीत १७५ रुपये दराने कांदा खरेदी केल्याने आंदोलन स्थगित झाले. बुधवारी (दि. ६) सटाणा बाजार समितीत कऱ्हे येथील शेतकरी जितेंद्र बाळू साळुंखे यांनी आपला कांदा विक्रीसाठी सटाणा बाजार समितीत आणला होता. लिलाव प्रक्रियेत या कांद्यास अवघा ५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकरी साळुंखे यांनी कांद्याचा ट्रॅक्टर थेट बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभा करीत निषेध म्हणून येथे कांदा फेकून देण्याचा पवित्रा घेतला. या आंदोलनाला उपस्थित शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिल्याने वातावरण अधिक तापले. तर काही शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रस्त्यावर आडवे लावत वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, बाजार समितीचे संचालक गैरहजर असल्याने जवळपास एक ते दोन तास शेतकरी आक्रमक भूमिकेत होते. अखेर पोलिस उपनिरीक्षक अमोल सूर्यवंशी तसेच बाजार समितीचे लेखापाल भगवान अलई यांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करीत शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. ^तीन दिवसांपूर्वी हाच कांदा साडेतीनशे रुपये दराने मागितला होता. बुधवारी तिसऱ्या दिवशी पुन्हा कांदा विकायला बाजार समितीत आणला, मात्र त्याला फक्त पन्नास रुपये भाव पुकारला. त्यामुळे संताप झाला. मात्र, कुणीच अधिकारी लक्ष देत नसल्याने आंदोलनाचा पवित्रा घेतला. – जितेंद्र साळुंखे, शेतकरी. ^बागलाण तालुक्यात अवकाळी पावसामुळे बहुतांश कांदा खराब झाला आहे. शेतकरी साळुंखे यांचा कांदा खराब होता. त्यामुळे पन्नास रुपये दराने त्याचा पुकारा झाला. मात्र, याबाबत आंदोलन झाल्याने अखेर मध्यस्थी करीत १७५ रुपये भाव वाढवून देण्यात आला. – भास्कर तांबे, सचिव, सटाणा बाजार समिती.
