कळवणला 17 ग्रामपंचायतींची जालना जिल्ह्यातील परतूरच्या टीमकडून पाहणी:मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विकासकामांचे स्कॅनिंग
![]()
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत कळवण तालुक्यातील एकूण १७ गावांची परतूर, जि. जालना टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. ग्रामपंचायत बिलवाडी येथे तपासणी व पाहणी कामासाठी आलेल्या मान्यवर टीमचे ग्रामपंचायतीच्या वतीने उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले
.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची पाहणी करून मार्गदर्शन केले. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा, डिजिटल सेवा, नागरी सुविधा व विविध विकासकामांची माहिती घेऊन त्यांनी कामाचे कौतूक केले. ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या संयुक्त प्रयत्नातून गाव विकासाची वाटचाल अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘समृद्ध गाव – सक्षम ग्रामपंचायत’ या उद्देशाने ग्रामविकासाची वाटचाल अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अभियानात सहभागी असलेल्या बिलवाडीसह शिरसमणी, मेहदर, जयपूर, सावकी पाळे, कुंडाणे क., देवळी वणी, पळसदर, खर्डे दिगर, कोसुर्डे, वडाळे हा., सरले दिगर, वाडी बु, भेंडी, नाकोडे, पिळकोस व पाळे बु. आदी गावांच्या तपासणी साठी परतूर, जि. जालना येथून आलेले टीमचे गटविकास अधिकारी राजेश तांगडे, विस्तार अधिकारी युवराजसिंग परदेशी, ग्रामपंचायत अधिकारी बी. एम. वर्धुळे, तालुका व्यवस्थापन उमेद संदीप दाभाडे, तांत्रिक सहाय्यक गौरव राजे, तालुका व्यवस्थापक अभिजित सोनपावले , बालविकास प्रकल्प अधिकारी कांबळे, तांत्रिक सहाय्यक अमोल राठोड यांच्या कडून तपासणी सुरु आहे.
तपासणीसाठी कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ व सहाय्यक गट विकास अधिकारी वंदना सोनवणे यांच्या मार्गदर्शनखाली विस्तार अधिकारी वाय. एस. सोनवणे, कृषी अधिकारी प्रणय हिरे, तालुका व्यवस्थापक पिंटू मानवर, रोजगार हमीचे अनिल सोनवणे, घरकुलचे महेंद्र देवरे यांसह सर्व विभागप्रमुख प्रयत्नशील आहेत. या अभियानामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता येऊन गावांच्या सर्वांगीण विकासाला मोठी गती मिळणार आहे.
