प्रशिक्षण शिबिरांतून मिळते शिस्त अन् आत्मविश्वास:नगरमध्ये उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन, विद्यार्थ्यांना घेतला उत्साहाने सहभाग
![]()
आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ शिक्षणाबरोबरच खेळही महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागातील अनेक खेळाडूंमध्ये प्रचंड क्षमता आहे, मात्र योग्य मार्गदर्शन व सुविधा मिळाल्या नाहीत तर ही प्रतिभा दडपून जाते. हेच लक्षात घेऊन शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरातून खेळाडूंना केवळ खेळाचे तंत्र नव्हे, तर शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना यांचे शिक्षण मिळणार आहे. प्रशिक्षकांकडून मिळणारे मार्गदर्शन आत्मसात करून खेळाडूंनी स्वतःची शारीरिक क्षमता वाढवावी आणि उच्च पातळीवर पोहोचण्याचे ध्येय ठेवावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने २० दिवसांच्या प्राथमिक व अद्ययावत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, संतोष वाबळे, प्रियंका खिंडरे, सोमनाथ राऊत, गणेश वारुळे, रामेश्वर चिमटे, सौरभ मराठे आदी उपस्थित होते. या शिबिरात खो-खो, बॅडमिंटन, कुस्ती आणि कबड्डी या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार असून शिबिर दोन टप्प्यात आयोजित करण्यात आले आहे. पहिला टप्पा ४ मे ते १३ मे तर दुसरा टप्पा १८ मे ते २७ मे या कालावधीत पार पडणार आहे. शिबिरामध्ये अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन दिले जात आहे. कुस्ती या खेळासाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, खो-खो साठी संतोष वाबळे तर बॅडमिंटनसाठी विशाल गर्जे यांनी खेळाडूंना प्रशिक्षण देत क्रीडा क्षेत्रातील संधी, तंत्र आणि फिटनेसबाबत सखोल मार्गदर्शन केले. याशिवाय खेळातील बारकावे शिकवून खेळाडूंना स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. शिबिराच्या ठिकाणांमध्ये विविध क्रीडा केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे. खो-खोचे प्रशिक्षण बाणेश्वर क्रीडा मंडळ, बुऱ्हाणनगर तसेच आबासाहेब काकडे विद्यालय, निर्मलनगर (शेवगाव) येथे होणार आहे. बॅडमिंटन व कबड्डीचे प्रशिक्षण जिल्हा क्रीडा संकुल, अहिल्यानगर येथे दिले जाणार आहे. तर कुस्तीचे प्रशिक्षण संभाजी राजे कुस्ती केंद्र, सावेडी आणि तालुका क्रीडा संकुल, बुऱ्हाणनगर येथे पार पडणार आहे. दरम्यान, या शिबिराला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या शिबिराचे आयोजन दोन टप्प्यांत होत आहे. पहिल्या टप्प्यातील शिबिराला सुरुवात झाली आहे. या शिबिरात जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. शिबिरात खेळाडूंना विविध खेळांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच त्यांना प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. विविध मैदानी खेळांतील बारकावे देखील त्यांना शिकवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने परिश्रम घेतले जात आहेत.
