सुदृढ आणि निरोगी जीवनासाठी मैदानी खेळ आवश्यक- वाकळे:महापौर उद्यानात समर कॅम्पला उत्साहात प्रारंभ, चिमुकल्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
![]()
सुदृढ व निरोगी जीवनासाठी मुलांनी बालवयातच मैदानी खेळांची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. आजची मुले ही उद्याच्या भारताचे उज्ज्वल भविष्य असून त्यांच्यात योग्य संस्कार आणि क्रीडावृत्ती निर्माण करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले. संत तुकाराम महाराज प्रतिष्ठान सावेडी यांच्यावतीने महापौर उद्यान येथे ‘प्रिशा समर कॅम्प’चे आयोजन करण्यात आले असून या शिबिराला उत्साहात प्रारंभ झाला. याप्रसंगी वाकळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबाइल, टीव्ही आणि डिजिटल साधनांच्या अतिवापरामुळे बालकांमध्ये मैदानी खेळांबद्दलची आवड कमी होत चालली आहे. यामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या समर कॅम्पच्या माध्यमातून बालकांना केवळ खेळच नव्हे, तर क्रीडा, कला, संस्कृती आणि नैतिक मूल्यांचे धडे दिले जाणार आहेत. भारतीय परंपरेची ओळख करून देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. या शिबिरामध्ये ॲथलेटिक्स, योगा, रोप मल्लखांब, लाठी-काठी, हॉर्स रायडिंग, जिम्नॅस्टिक्स, झिप लाईन, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग, क्रिकेट, कबड्डी, एरोबिक्स डान्स यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांसोबतच मजेदार खेळ, जादूचे प्रयोग, गोष्टी सांगणे, सहली आणि बालसंस्कार वर्गांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय स्वच्छतेचे महत्त्व, शिस्त, टीमवर्क आणि सामाजिक जबाबदारी याबाबतही बालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत होणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि नैतिक मूल्यांची ओळख करून दिली जाणार आहे. शिस्त, टीमवर्क (सांघिक कार्य), सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेचे महत्त्व यावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमामुळे मुलांमधील आत्मविश्वास वाढून त्यांच्यात नेतृत्वगुण विकसित होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
