जमीन व्यवहार ‘कायदेशीर’ असल्याचा भोंदू खरातचा दावा:मला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिकाबदलली; सावकारकीचे आरोपही फेटाळले
![]()
शिर्डीतील बहुचर्चित जमीन गैरव्यवहार आणि सावकारकी प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे. जमीन खरेदी आणि कथित व्याज व्यवहाराबाबत पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. पोलिस चौकशीत खरातने शिर्डीतील जमीन खरेदी नियमानुसार व कायदेशीर प्रक्रियेतून झाली असल्याचा दावा केला आहे. संबंधित व्यवहार ५ कोटी ५२ लाख रुपयांत झाल्याचे त्याने मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. फिर्यादीने केलेला २ टक्के व्याजाने पैसे देण्याचा आरोप त्याने फेटाळून लावला. २२ ऑगस्ट २०२३ रोजी जमिनीबाबत मुखत्यारपत्र तयार केले होते. त्याच दिवशी खरेदी व्यवहार होणार होता; परंतु मूळ जमीनमालक हजर न राहिल्याने २३ ऑगस्ट रोजी व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचे खरातने पोलिसांना सांगितले. जमीन परत करण्याबाबत काहीही ठरलेले नव्हते. मला अडचणीत आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली आहे, अशी माहिती त्याने तपासात दिली. चौकशीदरम्यान काही मुद्द्यांवर खरात उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचेही समोर आले. शिर्डीत किती वेळा आला होता, याबाबत त्याने स्पष्ट माहिती दिली नाही. शिर्डी पोलिसांच्या कोठडीत असताना खरात प्रश्नांना शांतपणे उत्तरे देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. खरातला रक्तदाब अन् मधुमेहाची औषधे सुरू खरातची प्रकृती लक्षात घेता त्याला रक्तदाब व मधुमेहाची औषधे दिली जात असून, रात्री त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोठडीत तो सकाळी साधे जेवण घेत असला, तरी संध्याकाळी जेवण टाळत असल्याचे समजते. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारासंबंधी पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
