महालक्ष्मी सरस 2026:अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्रामीण संस्कृतीचा जागतिक दर्जाचा संगम; फुले दांपत्याच्या विचारांची थीम
![]()
महालक्ष्मी सरस 2026 यंदा आपल्या भव्य थीम पॅव्हेलियन, आकर्षक सजावट आणि जागतिक दर्जाच्या संकल्पनेमुळे विशेष चर्चेत आले आहे. महाराष्ट्राची संस्कृती, ग्रामीण जीवन, महिला सक्षमीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर संगम यंदाच्या पॅव्हेलियनमध्ये पाहायला मिळत आहे. यंदाची मुख्य थीम महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दी वर्षाला समर्पित करण्यात आली आहे. स्त्रीशिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि शिक्षणप्रसारासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाला अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे. मुख्य प्रवेशद्वार, बाह्य सजावट, मुख्य मंच आणि विविध भागांमध्ये फुले दांपत्यांचे विचार आणि कार्य प्रभावी दृश्यरूपातून साकारण्यात आले आहे. यंदाच्या सरसमधील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे सुमारे 40 मीटर लांब आणि 7 मीटर उंचीचा भव्य त्रिमितीय एलईडी पडदा. अत्याधुनिक दृश्यतंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात आलेल्या या पडद्यावर महिला बचत गट, ग्रामीण विकास, “लखपती दीदी” उपक्रम, तसेच महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रभावी दृश्यरूप सादर करण्यात येत आहे. पडद्यावरील दृश्ये प्रत्यक्ष बाहेर येत असल्याचा अनुभव नागरिकांना मिळत असून, हा भाग विशेष आकर्षण ठरत आहे. महाराष्ट्रातील प्रदर्शन संस्कृतीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेला हा दृश्य अनुभव जागतिक स्तरावरील प्रदर्शनांची अनुभूती देणारा ठरत आहे. पॅव्हेलियनच्या बाह्य भागामध्ये कंटेनर संकल्पनेवर आधारित विशेष सजावट करण्यात आली आहे. हे कंटेनर प्रत्यक्ष वापरासाठी नसून, व्यापार, वाहतूक, शेतकरी आणि व्यवसाय व्यवस्थेमधील अतूट नाते दर्शवण्यासाठी प्रतीकात्मक स्वरूपात साकारण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील उत्पादने बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्यात वाहतूक आणि व्यापार व्यवस्थेचे असलेले महत्त्व या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. तसेच यंदाच्या सजावटीमध्ये पिंगोळी कला, पारंपरिक महाराष्ट्राची कलाकुसर, पैठणी, नथ आणि ग्रामीण हस्तकलेचा सुंदर वापर करण्यात आला आहे. आधुनिक प्रकाशयोजना आणि पारंपरिक सजावट यांचा संगम संपूर्ण परिसराला भव्यता प्रदान करत आहे. महालक्ष्मी सरस 2026 हे केवळ प्रदर्शन नसून, महाराष्ट्राची संस्कृती, ग्रामीण उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा जागतिक दर्जाचा अनुभव ठरत आहे. दिग्दर्शिका किरण राव यांची प्रदर्शनाला भेट महालक्ष्मी सरस प्रदर्शन मुंबईकरांसोबतच आता सेलिब्रिटींचे देखील आकर्षण ठरत असून, आतापर्यंत अनेक दिग्गज व सेलिब्रिटींनी या प्रदर्शनाला भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले आहे. आज, प्रदर्शनाच्या पाचव्या दिवशी चित्रपट दिग्दर्शिका किरण राव यांनी प्रदर्शनाला भेट दिली. यावेळी उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर (भाप्रसे) हे देखील उपस्थित होते. या भेटीनंतर महिला उद्योजकांच्या कामाने आपण प्रेरित झाल्याचे किरण राव यांनी म्हटले. संपूर्ण महाराष्ट्राची खाद्य संस्कृती, ग्रामीण उद्योजक महिला, शेतकरी महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने असे सर्व घटक एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने हे प्रदर्शन आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. त्यामुळे या भेटीनंतर, “महालक्ष्मी सरसचे वातावरण अत्यंत सुंदर, प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला उद्योजकांनी साकारलेले हे प्रदर्शन पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. अशा प्रकारचे भव्य आणि वैविध्यपूर्ण प्रदर्शन मी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते.” अशी प्रतिक्रिया किरण राव यांनी दिली आहे. त्या पुढे म्हणाल्या, “येथे महिलांची कामगिरी प्रत्यक्ष पाहायला मिळते. शेतीशी निगडित उपक्रम, ग्रामीण भागातील उत्पादनांचे विविधीकरण, नाविन्यपूर्ण व्यवसाय कल्पना, हस्तकला, सेंद्रिय उत्पादने आणि घरगुती उद्योग या प्रदर्शनात पाहायला मिळाले. महिलांना आणि उद्योजकांना आपले काम मोठ्या व्यासपीठावर सादर करण्याची ही अत्यंत महत्त्वाची संधी आहे. मला इथे पुन्हा यायला नक्की आवडेल.”
