नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवत 4 किलोमीटर फरफटत नेलं:मुरूम माफियांची दहशत वाढली; नागपुरात कायद्यालाच खुलं आव्हान

0
730-x-548-new-2026-05-07t124608888_1778138505.jpg




नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे. बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना मुरूम माफियांनी थेट चालत्या जेसीबीला लटकवत तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महसूल आणि पोलिस प्रशासनात संतापाची लाट उसळली असून मुरूम माफियांची वाढती दहशत पुन्हा एकदा उघड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानंतर नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे आपल्या पथकासह कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले. महसूल पथकाने जेसीबी आणि इतर यंत्रणा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, कायद्याचा धाक न बाळगता जेसीबी चालकाने वाहन थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने पळवण्यास सुरुवात केली. यावेळी निकाळजे यांनी जेसीबी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना वाहनासोबत ओढत नेण्यात आले. या संपूर्ण प्रकाराने काही काळ परिसरात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. नायब तहसीलदारांना चालत्या जेसीबीला लटकवून आरोपींनी गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. जवळपास चार किलोमीटरपर्यंत हा थरार सुरू होता. दरम्यान, पोलिसांची वाहने घटनास्थळाकडे येताना दिसताच जेसीबी चालक घाबरला आणि वाहन सोडून पळून गेला. सरकारी अधिकाऱ्याच्या जीवाशी खेळ करत अशा प्रकारे हल्ला झाल्याने महसूल विभागातील अधिकाऱ्यांनीही संताप व्यक्त केला आहे. या घटनेमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांचे धाडस किती वाढले आहे, याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच कुही पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला वेग दिला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जेसीबी चालक मयूर थोटे याला अटक केली आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सरकारी अधिकाऱ्याच्या जीविताला धोका निर्माण करणे आणि हल्ला करण्यासारख्या गंभीर कलमांखाली त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आणखी काही जण सहभागी असल्याचा संशय पोलिसांना असून इतर आरोपींचाही शोध सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे महसूल अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रात्रीच्या वेळी अवैध उत्खनन रोखण्यासाठी धाड टाकणाऱ्या पथकावरच हल्ला झाल्याने प्रशासन चिंतेत आहे. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांनीही या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. अवैध कामांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या सरकारी पथकावर असा जीवघेणा हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मुरूम माफियांनी संघटितपणे विरोध केल्याचेही त्यांनी सांगितले. अटकेत असलेल्या आरोपीची कसून चौकशी या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अवैध मुरूम उत्खननाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनावरही दबाव वाढू लागला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून अटकेत असलेल्या आरोपीची कसून चौकशी करण्यात येत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी अवैध उत्खननाविरोधात आणखी कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed