तीनचा जनता दरबार 5:45 वाजता; वैजापूर पंचायत समितीत घोषणाबाजी:गोंधळ वाढताच कलेक्टर बीडीओंच्या केबिनमध्ये दाखल
![]()
पंचायत समितीत बुधवारी आयोजित जनता दरबार नागरिकांसाठी ‘प्रतीक्षेचा दरबार’ ठरला. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सीईओ मिन्नू पी.एम. आणि तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत जनता दरबार होणार असल्याने नागरिक दुपारी २ वाजेपासूनच पंचायत समितीत जमा झाले होते. मात्र अधिकारी वेळेवर आले तरी त्यांनी जनता दरबाराऐवजी बंद दाराआड आढावा बैठक सुरू केली. तब्बल अडीच तास नागरिकांना बाहेर थांबवल्यानंतर संतप्त नागरिकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाला जाब विचारला. अखेर वाढता रोष पाहून प्रशासनाला सायंकाळी ५:४५ वाजता जनता दरबार सुरू करावा लागला. बुधवारी पंचायत समितीत जलयुक्त शिवार २.० अंतर्गत विविध जलसंधारण योजनांचा आढावा घेण्यात आला. मात्र दुसरीकडे जनता दरबारासाठी आलेल्या नागरिकांचा संयम संपत चालला होता. सभागृहात अधिकारी बैठक घेत असताना बाहेर नागरिक तक्रारी घेऊन प्रतीक्षेत बसले होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नागरिकांनी घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी सुरू होताच जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी थेट बीडीओंच्या केबिनमध्ये गेले. त्यानंतर संतप्त नागरिकांचाही मोर्चा केबिनकडे वळला. जनता दरबार सभागृहात घ्या, केबिनमध्ये नाही, असा जाब विचारत नागरिकांनी गोंधळ घातला. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले पथकासह पंचायत समितीत दाखल झाले. संतप्त नागरिकांची समजूत काढत त्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. काही काळ घोषणाबाजी आणि गर्दीमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘जनता दरबार घ्या, नागरिकांना वेळ द्या’ अशा जोरदार घोषणांनी पंचायत समिती परिसर काही काळ दणाणून गेला. सायंकाळी साडेपाचपर्यंतही अधिकारी बाहेर न आल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. वाढता गोंधळ पाहून अखेर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. दुपारी ३ वाजता जनता दरबाराचे अधिकृत आयोजन असताना नागरिकांना तब्बल अडीच तास प्रतीक्षेत ठेवण्यात आले. अधिकारी वेळेवर आले, मात्र त्यांनी थेट बंद दाराआड बैठक सुरू केल्याने संताप वाढला. निश्चित वेळ असूनही जनता दरबार उशिरा घेतल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तालुक्यातील नागरिकांना अडीच तास प्रतीक्षेत ठेवले केबिनमध्ये प्रशासन, बाहेर आंदोलन सुरू घोषणाबाजीने वैजापूर पंचायत समिती दणाणली
