नांदेड विभागाची तिकीट तपासणीत दमदार कामगिरी; एप्रिलमध्ये ₹१.५० कोटींचा उच्चांक
नांदेड (प्रतिनिधी) : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी उत्पन्नात एप्रिल २०२६ महिन्यात ऐतिहासिक कामगिरी नोंदवत ₹१.५० कोटींचा उच्चांक गाठला आहे. विशेष म्हणजे, हा आकडा एप्रिल २०२५ मधील ₹१.३४ कोटींच्या मागील विक्रमापेक्षा तब्बल १२ टक्क्यांनी अधिक आहे.
तिकीट तपासणी मोहिमेच्या सातत्यपूर्ण अंमलबजावणीमुळे आणि विनातिकीट प्रवासावर प्रभावी नियंत्रण ठेवल्यामुळे हा उल्लेखनीय वाढीचा दर साध्य झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी एका दिवसात ₹७.९१ लाख इतके उत्पन्न नोंदविण्यात आले, जे विभागाच्या इतिहासातील एका दिवसातील सर्वाधिक उत्पन्न ठरले आहे.
ही यशस्वी कामगिरी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांच्या मेहनत, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेमुळे शक्य झाली आहे. कर्मचाऱ्यांमधील उत्तम समन्वय, प्रभावी नियोजन आणि टीमवर्कमुळे विभागाने हा टप्पा गाठला आहे.
नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांनी या कामगिरीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी विविध विभागांतील समन्वय आणि व्यावसायिकतेचे कौतुक केले.
नांदेड विभाग प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम आणि दर्जेदार सेवा देण्यास कटिबद्ध असून भविष्यातही अशाच प्रगतीची वाटचाल सुरू ठेवणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Post Views: 119
