उजनी 15 दिवस उशिरा ‘मायनस’मध्ये ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याची कसरत:गतवर्षी एप्रिलमध्ये आले होते मृतसाठ्यात, सध्या 63 टीएमसी पाणीसाठा शिल्लक‎

0
dn109388346v-v62263_manual.jpg




सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून उन्हाळी आवर्तनासाठी पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. गेल्या १२ दिवसांत तब्बल १२ टीएमसी पाणी कमी झाले असून, मंगळवारी रात्री धरणाने उपयुक्त पाणीसाठ्यातून मृत साठ्यात (मायनस) प्रवेश केला आहे. सद्यस्थितीत धरणातून विविध सिंचन योजना आणि नदीद्वारे सुमारे १० हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने प्रशासनासमोर ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. उजनी धरणात सध्या ६३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असला तरी, तो मृत साठा मानला जातो. दररोज २ टक्के दराने पाणी कमी होत आहे. या घसरणीमुळे उजनी काठच्या शेतकऱ्यांची पिके वाचवण्यासाठी कसरत सुरू झाली असून, गाळात पाइपलाइन आणि केबल वाढवण्याची धावपळ सुरू आहे. “राजकारण्यांनी प्रशासनावर दबाव टाकून उजनी रिकामी करण्याचा प्रयत्न चालवला आहे, असा संतापही शेतकरी व्यक्त करत आहेत. जिल्ह्यासह शेकडो गावांची तहान हे धरण भागवते. त्यामुळे या धरणातील पाणी पातळीवर लक्ष लागले. पावसाळा वेळेवर न झाल्यास ही मायनस स्थिती अधिक भयानक होण्याची भीती आहे. जुलैमहिन्यातील आषाढी वारीसाठी आवर्तनाचे नियोजन येत्या जुलैमध्ये आषाढी एकादशी आहे. पंढरपूरला येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी उजनीतून पाणी सोडावे लागल्यास आणखी ५ ते ७ टीएमसी पाण्याची घट होईल. जर पावसाने दगा दिला, तर भविष्यात भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. सद्यस्थितीत नदीतून ६००० क्युसेक, मुख्य कालव्यातून २८६० क्युसेक, बोगद्यातून ६१० क्युसेक आणि दहीगाव योजनेतून ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात उष्णतेची लाट असल्याने बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढला आहे. कालवे, बोगदा आणि नदी पात्रातील विसर्गासह बाष्पीभवन मिळून दररोज जवळपास २ टक्के (१ टीएमसी) पाणी कमी होत आहे. ही गती अशीच राहिली तर पावसाळ्यापूर्वी धरणाचा तळ दिसण्याची भीती निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed