नागरिकांना अखंडित वीज द्या, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका:सभापती प्रा. राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

0
253_177799241669fa02e05da02_8db4.jpg




कर्जत-जामखेड तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नागरिकांचा संयम सुटला असून, आता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी थेट महावितरणच्या रडारवर घेतले आहे. “नागरिकांना अखंडित वीज मिळालीच पाहिजे, उडवाउडवीची उत्तरे देऊ नका, तातडीने कृती करा, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. विशेषतः सायंकाळी ६ ते १० या वेळेत वीज खंडित झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या आढावा बैठकीत प्रा. शिंदे यांनी महावितरणच्या गलथान कारभाराचे वाभाडे काढले. “केवळ आश्वासन नको, तर जमिनीवर काम हवे,” असे म्हणत त्यांनी उपस्थित अधीक्षक अभियंता रमेश पवार यांच्यासह संपूर्ण यंत्रणेची झाडाझडती घेतली. कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण वारे, प्रदीप कटकधोंड यांच्यासह तालुक्यातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. वाढत्या लोडनुसार ट्रान्सफॉर्मरची क्षमता तातडीने वाढवा, जळालेले ट्रान्सफॉर्मर २४ तासांत बदला, गळफास ठरणाऱ्या तारा बदला: जुन्या आणि धोकादायक वीजवाहिन्यांचे तात्काळ नूतनीकरण करा, तक्रार कक्षात फोन उचलला गेलाच पाहिजे; सेवा पारदर्शक आणि जलद करा, तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी सक्षम आणि जलद प्रतिसाद देणारी ‘रिस्पॉन्स टीम’ तयार करा, असे निर्देश सभापती प्रा. शिंदे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. “उन्हाळ्याच्या कडाक्यात सर्वसामान्यांचे हाल होत असताना यंत्रणा सुस्त कशी?” असा सवाल करत प्रा. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना ‘अल्टिमेटम’ दिला आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण न झाल्यास किंवा कामात कसूर आढळल्यास थेट संबंधित विभागाच्या प्रमुखावर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. ६ ते १० वेळेत लोडशेडिंग खपवून घेणार नाही! प्रा. शिंदे यांनी घरगुती आणि व्यापारी वापरासाठी अत्यंत संवेदनशील असलेल्या सायंकाळी ६ ते १० या वेळेवर विशेष भर दिला. या काळात वीज पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, यासाठी चोख नियोजन करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले. अनियमित लोडशेडिंगमुळे शेतकरी, व्यापारी आणि लघुउद्योजक देशोधडीला लागत असल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed