पुण्यात 9 वर्षीय नातीवर आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न:नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; संतप्त जमावाचा राडा
![]()
पुण्यातील पर्वती पायथा परिसरात एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्याच 9 वर्षांच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असून, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, पर्वती पायथा परिसरात संबंधित 50 वर्षीय व्यक्तीने 9 वर्षांच्या मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिचे कपडे काढले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी काही स्थानिक नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली. नागरिकांनी आरडाओरडा करताच आरोपीचे कृत्य उघड झाले आणि पुढील अनर्थ टळला. पीडित मुलगी आणि आरोपी हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक असून, आरोपी हा मुलीचा सख्खा आजोबा आहे. ही घटना परिसरात पसरताच शेकडो नागरिक घटनास्थळी जमा झाले. संतापलेल्या जमावाने आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला आपल्या ताब्यात देण्याची मागणी पोलिसांकडे केली. “आरोपीला आमच्या हवाली करा,” अशा घोषणा देत नागरिकांनी गोंधळ घातला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने धाव घेतली. जमावाचा वाढता रोष पाहता पोलिसांनी मध्यस्थी केली. संतप्त नागरिकांना शांत करत पोलिसांनी सांगितले की, “कोणीही कायदा हातात घेऊ नका, आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा दिली जाईल.” पोलिसांनी आरोपीला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले आणि पोलीस व्हॅनमधून सुरक्षितपणे पोलीस ठाण्यात नेले. सध्या पोलिसांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
