१९८ महिला कर्जदारांकडून वसूल केलेले २२.३५ लाख हडपल्याचा आरोप; दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

[ads1]

माहूर (प्रतिनिधी) –  भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीच्या माहूर शाखेतील १९८ महिला कर्जदारांकडून कर्जाचे हप्ते व मुदतपूर्व एकूण २२ लाख ३५ हजार ३४५ रुपये वसूल करून कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी हडप केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध माहूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित अरुण वाघमारे (वय २८, रा. अकोली, ता. उमरखेड, जि. यवतमाळ) आणि तुकाराम विनोद येळकेवाड (वय २६, रा. संभाजीनगर, ता. हदगाव) यांनी संगनमत केल्याचा आरोप आहे. हे दोघे भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड कंपनीशी संबंधित काम पाहत होते. १ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० ते १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतच्या कालावधीत माहूर येथील कंपनीच्या शाखेत हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी शाखेतील एकूण १९८ महिला कर्जदार सदस्यांकडून कर्जाचे हप्ते तसेच मुदतपूर्व कर्जफेडीची रक्कम म्हणून २२,३५,३४५ रुपये वसूल केली. मात्र, ही रक्कम कंपनीच्या शाखेत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी कंपनीचे व्यवसाय एरिया मॅनेजर विनायक शरद महामुने (वय ४६, रा. सोनारी, ता. हिमायतनगर) यांनी माहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून माहूर गुरनं. १६६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ३१६(४), ३१६(५), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माहूर पोलिस करीत असून, कंपनीच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रे व वसुलीच्या नोंदी तपासल्या जाण्याची शक्यता आहे. आरोपींनी नेमकी किती रक्कम व कोणत्या पद्धतीने हडप केली, याबाबत पोलिस तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.


Post Views: 6






[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *