स्वतःचे नेते घडवता येत नाहीत, म्हणून रेडीमेड माल उचलता:उमेदवार निवडीवरून सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला, शिंदेंवरही घणाघात

महाराष्ट्र




शिवसेनेत फूट पडल्यापासून मुंबईत दोन दसरा मेळावे पार पडत आहेत. एकनाथ शिंदे यांचा मेळावा गोरेगावमध्ये तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा परंपरेप्रमाणे शिवाजी पार्कवर होत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्ताधारी महायुती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ‘शिंदे गट म्हणजे लाभार्थ्यांची टोळी’ खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नावर बोलताना अंधारे म्हणाल्या की, बाळासाहेबांचा ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा विचार ठाकरे गट जगतोय. याउलट शिंदे गट ही केवळ पैशांसाठी आलेली एक ‘लाभार्थी टोळी’ आहे. नगरसेवक फोडण्यासाठी आणि पक्षप्रवेशासाठी लाखोंचे वाटप झाले आहे. भाजपच्या दबावाखाली येऊन मंगेश चिवटेंचा अर्ज मागे घ्यावा लागला, यावरून शिंदेंचा स्वाभिमान आणि कणा किती शिल्लक आहे, हे स्पष्ट होते. ‘टायगर श्रॉफला भेटायला वेळ, मग पूर्णेकरांच्या घरी का नाही?’ प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून अंधारे यांनी उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल सेलिब्रिटी टायगर श्रॉफला भेटायला गेले. जर तुम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहता, तर ठाण्यात घराजवळच असलेल्या प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांना भेटायला तुम्हाला काय झाले होते? मीनाक्षी शिंदे आणि राजा शिंदे हेच पूर्णेकरांच्या हत्येचे सूत्रधार आहेत, पण एकनाथ शिंदे त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.” ‘स्वतःचे नेते घडवता येत नाहीत, म्हणून फडणवीसांना रेडीमेड माल लागतो’ देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना अंधारे यांनी भाजपच्या उमेदवार निवडीवर बोट ठेवले. “देवेंद्रजींना स्वतःच्या पक्षात नेते घडवता आलेत का? पदवीधर निवडणुकीत त्यांना स्मिता जाधव यांच्यासारखा ‘रेडीमेड माल’ उचलावा लागला. त्यांना स्वतःच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही. याउलट उद्धव ठाकरेंनी प्रवीण स्वामी, महेश सावंत यांसारख्या सामान्य कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन निवडून आणण्याची ताकद दाखवली आहे,” असा टोला त्यांनी लगावला. राज्यात दुष्काळ, सत्ताधाऱ्यांची मात्र करोडोंची उधळण राज्यात दुष्काळाची स्थिती असताना काटकसर करण्याऐवजी सत्ताधारी नेते पैशांची उधळण करत असल्याचा आरोप अंधारे यांनी केला. नरेंद्र मेहता, कैलास गोरंट्याल, प्रवीण दरेकर आणि स्वतः मुख्यमंत्री विविध कार्यक्रमांवर करोडो रुपये उधळत आहेत. आजच्या दिवशी या सर्वांना दुष्काळाचे गांभीर्य समजण्याची सद्बुद्धी मिळो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ‘भागवतांनी मोदींचेच कान टोचले’ नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘राष्ट्राप्रती निष्ठा’ असण्यावर भर दिला. यावर प्रतिक्रिया देताना अंधारे म्हणाल्या, “आम्ही सर्वच राष्ट्राप्रती निष्ठावान आहोत, पण भाजप म्हणजे राष्ट्र नव्हे. जे भाजपवाले तिरंगा हातात घेण्यावर बंदी आणतात, ते आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवू शकत नाहीत. आजचे मोहन भागवतांचे भाषण काळजीपूर्वक ऐकले, तर लक्षात येईल की त्यांनी सर्वाधिक कान हे मोदींचेच टोचले आहेत.” उद्धव ठाकरेंकडून काय अपेक्षा? आजच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देशभरात झालेल्या ‘वोट चोरी’च्या (मतचोरी) मुद्द्यावर थेट प्रहार करावा, अशी अपेक्षा सुषमा अंधारे यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच, कोल्हापूरमधील गोकुळ निवडणुकीत बंटी पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवून महायुतीच्या दिग्गज नेत्यांचा माज उतरवला आहे, कोल्हापूरकर कोणाचेही ऐकत नाहीत हे पुन्हा सिद्ध झाले, असेही त्या शेवटी म्हणाल्या. ————– हेही वाचा.. संख्याबळ वाढवून एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करू!: हीच जनतेची इच्छा म्हणत दसऱ्याच्या दिवशी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा राजकीय बॉम्ब “महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सामान्य जनतेला आणि प्रत्येक शिवसैनिकाला एकनाथ शिंदे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत असेच मनापासून वाटते. मुख्यमंत्रिपदासाठी सभागृहातील संख्याबळ अत्यंत महत्त्वाचे असते. आज आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ थोडे कमी असल्याने एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पदावर आहेत; मात्र आगामी विधानसभा निवडणुकांत शिवसेनेचे संख्याबळ मोठ्या प्रमाणावर वाढवून शिंदेंना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान करू आणि जनतेची इच्छा पूर्ण करू,” असा मोठा राजकीय बॉम्ब परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टाकला आहे. सविस्तर वाचा

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry