काँक्रीटच्या जंगलामुळे चिमण्यांचे ग्रामीण भागाकडे स्थलांतर:‘वाडा संस्कृती’सोबत पाखरेही झाली पोरकी, अहिल्यानगर शहरातील चिवचिवाट हरवला
![]()
प्रतिनिधी | अहिल्यानगर शहराचा वेगाने विस्तार होत असून जुन्या वाड्यांची जागा टोलेजंग अपार्टमेंट्स आणि फ्लॅट संस्कृतीने घेतली आहे. मात्र, या सिमेंटच्या जंगलात प्रगती साधली जात असली, तरी निसर्गाचा अविभाज्य भाग असलेली ‘चिमणी’ मात्र शहरातून हद्दपार होताना दिसत आहे. कधीकाळी अंगणात चिवचिवाट करणाऱ्या चिमण्या आता शहराच्या गजबजाटातून दूर जात ग्रामीण भागाकडे स्थलांतरीत झाल्याचे निरीक्षण पक्षीतज्ज्ञांनी नोंदवले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती भागात कौलारू वाडे आणि जुनी घरे मोठ्या प्रमाणात होती. या वाड्यांच्या लाकडी वाशांमध्ये, कोनाड्यांमध्ये आणि छताच्या फटींमध्ये चिमण्यांना हक्काचे घरटे बांधता येत असे. आता या वाड्यांच्या जागी काचेच्या आणि सिमेंटच्या चकचकीत इमारती उभ्या राहिल्या आहेत. आधुनिक आर्किटेक्चरमध्ये चिमण्यांना घरटे बांधण्यासाठी कुठेही जागा उरलेली नाही. शहरीकरणामुळे घरासमोरील अंगणे सिमेंटची झाल्याने आणि लहान झुडपांची संख्या घटल्याने चिमण्यांना मिळणारे खाद्य (कीटक व दाणे) मिळेनासे झाले आहे. त्यामुळे इवल्याशा पाखरांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. आपोआपच या पक्ष्यांनी शहराबाहेर स्थलांतरण केले असल्याचे पक्षीतज्ज्ञांनी म्हटले आहे. वाड्यांचे रूपांतर फ्लॅटमध्ये झाल्याने चिमण्यांचे नैसर्गिक वास्तव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे त्या ग्रामीण भागात स्थलांतरित झाल्याचे दिसून येते. जर आपण आपल्या बाल्कनीमध्ये थोडेसे निसर्गपूरक वातावरण तयार केले, तर ही पाखरे पुन्हा शहरात परतू शकतात, असे मत स्थानिक पक्षीप्रेमी मंदार साबळे यांनी व्यक्त केले आहे. चिमण्यांना पुन्हा शहरात आणण्यासाठी काही पर्यावरण प्रेमींनी पुढाकार घेतला आहे: १. कृत्रिम घरटी : लाकडी किंवा पुठ्ठ्याचे बर्ड हाऊस लावून चिमण्यांना निवारा देणे. २. पाणी आणि दाणा : उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गच्चीवर किंवा बाल्कनीत मातीच्या पात्रात पाणी आणि बाजरी-तांदूळ ठेवणे. ३. झुडपांची लागवड : शोभेच्या विदेशी झाडांऐवजी कढीपत्ता, जास्वंद किंवा मेहंदीसारखी देशी झुडपे लावणे, जिथे चिमण्यांना सुरक्षित वाटेल. निसर्गपूरक वातावरण हवे निसर्गाचा ‘सफाई कामगार’ चिमणी हा केवळ एक पक्षी नसून पर्यावरणाचा समतोल राखणारा घटक आहे. चिमण्या आपल्या पिल्लांना प्रामुख्याने अळ्या आणि लहान कीटक भरवतात, ज्यामुळे बागेतील आणि शेतातील पिकांचे रक्षण होते. निसर्गाच्या अन्नसाखळीत त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ राहणारा हा एकमेव धाडसी पक्षी मानला जातो.
