वैजापूरमध्ये विनापरवाना वॉटर प्लांटवर छापा:10 लाखांचा पॅकेज्ड पाणीसाठा जप्त, FDA ची धडक कारवाई




छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गंगापूर येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. एका विनापरवाना चालणाऱ्या पॅकेज्ड पिण्याच्या पाण्याच्या प्लांटवर छापा टाकण्यात आला. या छाप्यात १० लाख १ हजार ६०० रुपयांचा पॅकेज्ड पाण्याचा साठा जप्त करण्यात आला. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने गंगापूर येथील या वॉटर प्लांटची अचानक तपासणी केली. तपासणीत असे आढळले की, हा व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या. वैध प्रमाणपत्रांविना ग्राहकांची दिशाभूल करून पाण्याची विक्री केली जात होती. या प्लांटमध्ये ‘ओमरिच’, ‘यशरिच’ आणि ‘हायड्राशुअर’ या तीन ब्रँडच्या नावाने पिण्याच्या पाण्याचे पॅकेजिंग सुरू होते. कारवाईदरम्यान, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तिन्ही ब्रँडच्या पाण्याचे एकूण पाच नमुने प्रयोगशालेय तपासणीसाठी घेतले आहेत. आवश्यक परवानग्यांचा अभाव आणि ग्राहकांची फसवणूक लक्षात घेऊन, अन्न व औषध प्रशासनाने या वॉटर प्लांटला तात्काळ ‘व्यवसाय बंद करण्याची नोटीस’ (Stop Business Notice) बजावली. ही कारवाई राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने केली. जप्त केलेल्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *