दिवसभर ४४ अंश:सायंकाळी पाऊस
![]()
प्रतिनिधी । अमरावती शहरात शनिवारी २ मे रोजी दिवसभर कडक उन्हाच्या चटक्यांमुळे नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. तापमानाने ४४ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने उष्णतेचे चटके तीव्र जाणवत होते. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडले होते. सलग आठवडाभरापासून असलेल्या असह्य तापमानामुळे प्रचंड उकाड्याचा त्रास नागरिकांना होत आहे. अशातच सायंकाळी सहा वाजतापासून हवामानात अचानक बदल झाला. आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाने हजेरी लावली.जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे वातावरणात काहीवेळासाठी गारवा निर्माण झाला होता मात्र पाऊस बंद होताच पुन्हा तप्त जमिनीतील वाफांमुळे गरमी वाढली होती. दरम्यान, वादळामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांची धावपळ उडाली असून, पुढील काही दिवसही अशाच प्रकारच्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
