गृहमंत्रीच नसरापूर प्रकरणात आरोपी असायला हवेत:1500 रुपये देताय म्हणून बहिणींनी तोंड बंद ठेवावे का? संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

0
new-project-2026-05-03t100224503_1777784604.jpg




“राज्यात चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार होतो, कारण गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आपली कर्तव्ये पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. या प्रकरणात खरं तर सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजे. किंबहुना, या सरकारचेच ‘एन्काउंटर’ केले पाहिजे,” अशा अत्यंत आक्रमक शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. नसरापूर येथे एका ६५ वर्षीय नराधमाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. भीमराव कांबळे या आरोपीने एका साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला ‘वासरू दाखवतो’ असे आमिष दाखवून गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली. एवढेच नव्हे तर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना राऊत यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. मुख्यमंत्री प्रचारात मग्न, राज्याची सुव्यवस्था वाऱ्यावर राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे पूर्णपणे वाटोळे झालेले आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जी कर्तव्ये पार पाडायला पाहिजेत, ती पार पाडली जात नाहीत. सातत्याने लहान मुलींवर अत्याचारांची प्रकरणे समोर येत आहेत. महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे वाढलेली आहेत. मुख्यमंत्री आमचे टिवल्या-बावल्या करत इकडे तिकडे किंवा कधी पश्चिम बंगालध्ये, कधी केरळमध्ये, कधी आसामध्ये, कधी तामिळनाडून प्रचाराला जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्याची अवस्था एवढी गंभीर आहे. पण मुख्यमंत्री २४ तास त्यांच्या राजकारणात अडकलेले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. वाहतूक कोंडीची माफी, मग अत्याचार अन् हत्येची का नाही? १ मे रोजी मिसिंग लिंकच्या उद्घाटनावेळी वाहतूक कोंडी झाली. लोकांचे हाल झाले. म्हणून मुख्यमंत्र्यांनी काय विनम्रपणे माफी मागितली. मात्र, कालच्या प्रकरणाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. मुलींवर, महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एकदा तरी माफी मागितली आहे का‌? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अपयशाबद्दल माफी मागायला पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. १५०० रुपये देताय म्हणून बहिणींनी तोंड बंद ठेवावे का? सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा संदर्भ देत संजय राऊत यांनी अत्यंत बोचरी टीका केली. ते म्हणाले, “नसरापूरमधील त्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची ‘लाडकी बहीण’ असेल. फडणवीस तिच्या खात्यात १५०० रुपये टाकत असतील. पण त्या १५०० रुपयांच्या बदल्यात तिच्या चिमुरडीवर अत्याचार करण्याचा आणि तिची हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कुणाला दिलाय का? आम्ही पैसे देतोय, म्हणून त्या बहिणीने आता तोंड बंद ठेवावे, असे या सरकारला वाटते का?” महाराष्ट्रातील माता-भगिनींनी आता या सरकारविरोधात बंड पुकारण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. पोलिस केवळ राजकीय सुरक्षेसाठी शनिवारी नवले पुलावर आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचाही राऊत यांनी निषेध केला. “ज्या ग्रामस्थांच्या घरातील मुलगी गेली, ते न्यायासाठी रस्त्यावर उतरले तर सरकार त्यांच्यावर लाठीमार करते. तुमचा कायद्याचा धाक केवळ सामान्य जनतेवरच चालतो का? गुन्हेगारांना तुमची भीती का वाटत नाही? आज पोलिस दल केवळ राजकीय नेत्यांच्या सुरक्षेसाठी वापरले जात आहे. या राज्यात आता सामान्य माणसाला राहणे कठीण झाले आहे. फक्त पैशांचा माज आणि सत्तेच्या मस्तीवर हे सरकार चालले आहे,” अशी टीका त्यांनी केली. सरकारचेच एन्काउंटर करा आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी शनिवार नवले पुलावरील आंदोलनादरम्यान नसरापूर ग्रामस्थांनी केली होती. त्यावर संजय राऊत म्हणाले, या सरकारलाच जनतेचे ताब्यात घेतले पाहिजे. आरोपीला ताब्यात काय करणार? आरोपी सरकार आहे का? अशा प्रकरणात या राज्याचा गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे. या राज्याचे पोलिस आरोप असायला पाहिजे. पोलिस फक्त राजकीय सुरक्षेसाठी वापरले जात आहेत. आरोपी कोण आहे? या प्रकरणात सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखला केला पाहिजे. या सरकारचे एन्काउंटर केले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *