काळानुसार शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धत स्वीकारावी:नेप्तीत खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0
253_177771568569f5c9e5c7c4a_48162809069.jpg




प्रतिनिधी|अहिल्यानगर आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत पारंपरिक शेती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यावर भर दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धती स्वीकारावी असे आवाहन सहायक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी केले. तालुक्यातील नेप्ती येथील मारुती मंदिरात कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोफत जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात आले. आगामी खरीप हंगाम लक्षात घेऊन विविध पिकांच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी तसेच हुमणी किड नियंत्रण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना, तसेच ‘महाविस्तार एआय’ ॲपचा प्रचार प्रसार करण्यात आला. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती, हवामान अंदाज व मार्गदर्शन सहज उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी अशोक वाळके व उपकृषी अधिकारी अश्विनी भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. सरकारच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेतल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल. ‘महाविस्तार एआय’ सारख्या डिजिटल साधनांचा वापर करून शेतकरी अधिक सक्षम होऊ शकतात. शाश्वत शेतीचा अवलंबच शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेईल असेही नवले यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले, अजय कर्डिले, शेतकरी सोन्याबापू कानडे, रावसाहेब पुंड, सबाजी कांडेकर, लहू होळकर, दत्तात्रय फुले, मारुती गाडेकर आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या केल्याबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed