अकरावी प्रवेशासाठी 3 फेऱ्या, मुलींसाठी जादा राऊंड:दहावीच्या निकालानंतर नोंदणीचा पहिला टप्पा पूर्ण, आता पसंतीक्रम

0
9a8979a4-6c9a-4ed7-8893-f47ef9557544_1777738767593.jpg




बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना दहावीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. लवकरच दहावीचा निकाल लागण्याची शक्यता असल्याने अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला आहे. प्रवेशाच्या पहिल्या टप्प्यातील शाळा स्तरावरील ऑनलाइन नोंदणीचे काम पूर्ण झाले आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण तीन नियमित फेऱ्या होणार असून, मुलींसाठी एक विशेष जादा फेरी निश्चित करण्यात आली आहे. दहावीचा निकाल लागताच अभ्यासक्रम आणि महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्याचा दुसरा टप्पा सुरू केला जाईल. गेल्या वर्षीपर्यंत अकरावीचे ऑनलाइन प्रवेश केवळ महानगरांपुरते मर्यादित होते. आता ही प्रक्रिया महानगरांसोबतच ग्रामीण भागासाठीही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तालुका आणि गाव-खेड्यांतील विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांची माहिती पुस्तके विकत घेऊन कागदी अर्ज भरण्याऐवजी एकच ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळालेल्या पाच विषयांचे गुण प्रवेशासाठी आधारभूत मानले जातील. दहावीचा निकाल अद्याप घोषित व्हायचा असला तरी, सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. जे विद्यार्थी पहिल्या प्रयत्नात अनुत्तीर्ण होतील, त्यांच्यासाठी लगेच पुरवणी परीक्षा आयोजित करून उत्तीर्ण होण्याची संधी दिली जाईल. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया न जाता त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचे शासनाचे धोरण आहे. नियमित तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर, रिक्त जागांसाठी ‘सर्वांसाठी खुली’ फेरी घेतली जाईल, ज्यात विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल. त्यानंतर मुलींच्या प्रवेशासाठी एक विशेष फेरी आयोजित केली जाईल. प्रवेश अर्ज दाखल करताना प्रत्येक विद्यार्थ्याकडून शंभर रुपये शुल्क घेतले जाईल. विद्यार्थ्यांना कमाल दहा महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे. एकाच जागेसाठी समान गुण असलेले दोन किंवा अधिक विद्यार्थी असल्यास, त्यांच्या जन्मतारखा विचारात घेऊन वयाने ज्येष्ठ असलेल्या विद्यार्थ्याला प्राधान्य दिले जाईल. जन्मतारीख आणि गुण दोन्ही समान असल्यास, विद्यार्थ्यांच्या आडनावाचा इंग्रजी वर्णाक्षरानुसार क्रम लावून प्रवेश दिला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed