यावली शहीद गावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा:'जय गुरुदेव'च्या निनादात गाव दिव्यांनी उजळले

0
5f7e86ce-8d6d-41c0-a6c9-b11abcfabc47_1777738996977.jpg




यावली शहीद (अमरावती): अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव नजीकच्या यावली शहीद गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या जन्मभूमी असलेल्या या गावात पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ‘जय गुरुदेव’च्या निनादात आणि दिव्यांच्या रोषणाईत सोहळ्याला सुरुवात झाली. पहाटे ४ वाजल्यापासून राष्ट्रसंत जन्मावतरण व पुष्पांजली सोहळा गुरुकुंज येथील गोपाल सालोटकर व त्यांच्या संचाने सादर केला. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. देवेंद्र यादव होते, तर श्रीकृष्ण पखाले यांनी सूत्रसंचालन केले. खासदार बळवंत वानखडे, आमदार राजेंद्र वानखडे, माजी मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ग्रामनाथांचा सत्कार करण्यात आला. दिवसभर विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. सकाळी ६.३० वाजता ग्राम प्रदक्षिणा व स्पर्धात्मक पालखी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता ह.भ.प. श्री. लक्ष्मणदास काळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. दुपारी १ वाजता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी ७.३० वाजता ऐतिहासिक सत्यावर आधारित ‘ज्योतिबाची सावली, सावित्री माऊली’ हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मोत्सव समिती आणि सर्व गावकऱ्यांनी मिळून या ग्राम जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. या जन्मोत्सवासाठी संपूर्ण गाव लख्ख प्रकाशात न्हाऊन निघाले होते. पहाटे तीन वाजल्यापासूनच गावात अतिशय प्रसन्न वातावरण होते. विविध भागांतून आलेल्या गुरुभक्तांचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. गावातील प्रत्येक रस्ता सडा टाकून रांगोळ्यांनी सजवण्यात आला होता, तर घरोघरी दारात व अंगणात दिवाळीप्रमाणे दिव्यांची आरास करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed