नसरापुरातील घटनेनंतर नागरिकांचा रास्ता रोको:मुंबई-सातारा हायवे 'ठप्प'; मुख्यमंत्री येईपर्यंत महामार्ग न उघडण्याचा आंदोलकांचा पवित्रा

0
new-project-2026-05-02t212124892_1777737121.jpg




भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर ६५ वर्षांच्या नराधमाने केलेल्या अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला तात्काळ मृत्युदंडाची शिक्षा मिळावी यासाठी नसरापूरमधील हजारो ग्रामस्थांनी पुणे-सातारा (मुंबई-बंगळुरू) महामार्गावर वडगाव पुलावर प्रचंड ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दोन तासांपासून महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा पवित्रा घेतला आहे. भोर तालुक्यातील नसरापूर येथे राहणाऱ्या भीमराव कांबळे (वय ६५) या नराधमाने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीला ‘वासरू दाखवतो’ असे आमिष दाखवून गुरांच्या गोठ्यात नेले. तिथे तिच्यावर अनन्वित अत्याचार करून या नराधमाने दगडाने ठेचून तिची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने चिमुकलीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवून ठेवला होता. या क्रूर कृत्याची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वडगाव पुलावर आंदोलक आक्रमक या घटनेच्या निषेधार्थ आज सायंकाळी ५ वाजेपासून नसरापूरमधील ग्रामस्थांनी महामार्गावरील हॉटेल सुवर्णासमोर ठिय्या मांडला आहे. “आरोपीला आमच्या ताब्यात द्या,” “नराधमाला गोळ्या घाला,” आणि “आमच्या लेकीला न्याय द्या,” अशा संतप्त घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. आंदोलक इतके आक्रमक आहेत की त्यांनी महामार्गावरून एकही गाडी जाऊ दिलेली नाही. जोपर्यंत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः येथे येत नाहीत, तोपर्यंत महामार्ग रिकामा करणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पोलिस प्रशासन हतबल? घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, “बाळाला न्याय मिळाल्याशिवाय रस्ता मोकळा करणार नाही,” असा ठाम निर्धार महिला आणि ग्रामस्थांनी केल्यामुळे पोलिसांचे प्रयत्न अद्याप तरी निष्फळ ठरले आहेत. ट्रॅफिक ॲडव्हायझरी (पुणे शहर वाहतूक शाखा) वडगाव ब्रिज येथे हॉटेल सुवर्णा समोर सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे मुंबईकडून साताऱ्याकडे तसेच साताऱ्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही वाहतूक मार्गिका (लेन) पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहेत. म्हणून, सदर मार्गावर प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी वडगाव ब्रिजकडे येणे टाळावे. कृपया सुरक्षित ठिकाणी थांबून राहावे किंवा पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्तांनी केले आहे. राज्यात संतापाची लाट साडेतीन वर्षांच्या बालिकेवरील या अत्याचाराच्या घटनेमुळे राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी या घटनेचा निषेध करत खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, महामार्गावर अडकलेल्या हजारो प्रवाशांचे हाल होत असून, आंदोलक आपल्या मागणीवर ठाम आहेत. नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल नसरापूर येथे अल्पवयीन बालिकेसंदर्भात घडलेली घटना अत्यंत दुदैवी आणि संतापजनक आहे.या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात आरोपीला कायद्याच्या चौकटीत जास्तीत जास्त शिक्षा मिळावी आणि पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आयोग राज्य शासनाला महत्त्वपूर्ण शिफारशी करणार आहे. या प्रकरणात न्यायप्रक्रिया जलदगतीने पार पडावी यासाठी विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची आणि सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी दिली आहे. बालिकेच्या कुटुंबियांना आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आयोगाकडून स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्क ठेवून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात असून आवश्यक त्या सूचना देखील दिल्या जात आहेत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये निर्माण झालेला संताप समजण्यासारखा असला तरी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहनही आयोगाचे अध्यक्ष यांनी केले आहे. बालिकेला आणि तिच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आयोग सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed