महाराष्ट्र दिन सुतकी पद्धतीने?:राज ठाकरेंची टीका, हुतात्मा स्मारकावरून घेरलं; भावनिक आवाहन करत सरकारच्या भूमिकेवर सवाल
![]()
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकातील परिस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. स्मारकाजवळील वातावरण आणि तयारी पाहून त्यांनी नाराजी व्यक्त करत सोशल मीडियावर सडेतोड पोस्ट लिहिली असून, सरकारच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. महाराष्ट्र दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हुतात्मा चौक येथे जाऊन राज ठाकरेंनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. हा दिवस केवळ उत्सवाचा नसून, राज्याच्या निर्मितीसाठी दिलेल्या बलिदानांची आठवण ठेवण्याचा असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुंबईसारख्या शहरासाठी मराठी माणसांनी केलेल्या संघर्षाचे स्मरण करण्याची ही वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, स्मारकाजवळील वातावरणाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हुतात्मा स्मारक परिसरात अपेक्षित सजावट दिसली नाही, तसेच सरकारी यंत्रणेकडून उत्साहाचा अभाव जाणवल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, महाराष्ट्र दिन हा केवळ औपचारिकतेपुरता साजरा केला जात असून, त्यामागील भावनिक आणि ऐतिहासिक महत्त्वाकडे दुर्लक्ष होत आहे. सरकारवर टीका करताना राज ठाकरे म्हणाले की, हा दिवस राज्याच्या अभिमानाचा असताना तो अगदी सुतकी पद्धतीने साजरा होत असल्याचे चित्र दिसते. सरकारच्या मनात या दिवसाबद्दल अनास्था आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, जर एखाद्या इतर मोठ्या कार्यक्रमाचा दिवस असता, तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सजावट आणि आयोजन झाले असते, असेही त्यांनी सूचित केले. हुतात्मा चौकात येऊन अभिवादन करण्याचे आवाहन यापुढे बोलताना त्यांनी मराठी समाजालाही आत्मपरीक्षणाचे आवाहन केले. हुतात्मा स्मारक हे केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून, संपूर्ण राज्यासाठी अभिमानाचे प्रतीक आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोकांची उपस्थिती असायला हवी, मिरवणुका निघायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मात्र, नागरिकांमध्येही या स्मारकाबद्दलचा ओढा कमी झाल्याचे त्यांनी नमूद केले. शेवटी त्यांनी मराठी जनतेला भावनिक साद घालत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण जपण्याचे आवाहन केले. आपली भाषा, संस्कृती आणि प्रांत यांचा अभिमान बाळगला तरच इतरांकडून त्याचा सन्मान मिळतो, असे सांगत त्यांनी पुढील वर्षी 1 मे रोजी मोठ्या संख्येने हुतात्मा चौकात येऊन हुतात्म्यांना अभिवादन करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा… सस्नेह जय महाराष्ट्र, सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन, या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे. पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ?
वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय. मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ? बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे. पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत. माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल. मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील. राज ठाकरे ।
