मामासाहेब, सदानंद मोहोळ यांच्या पुतळ्यांचे मुळशीत अनावरण:उल्हास पवार म्हणाले – मामासाहेबांनी राजकारणाला समाजकार्याची जोड दिली

0
65a52788-46c5-4261-92c1-666406977b8e_1777278805412.jpg




पुण्याजवळील घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथील मामासाहेब मोहोळ मेमोरिअल स्कूलमध्ये महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे संस्थापक, माजी आमदार स्वर्गीय मामासाहेब मोहोळ आणि त्यांचे पुत्र कसोटीपटू स्वर्गीय सदानंद मोहोळ यांच्या अर्धाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमामुळे ग्रामीण विकासातील त्यांच्या योगदानाला उजाळा मिळाला. मामासाहेब मोहोळ यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते झाले, तर सदानंद मोहोळ यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, संस्थेचे कार्याध्यक्ष संग्राम मोहोळ आणि विश्वस्त कुणाल मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी आमदार उल्हास पवार यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मामासाहेब मोहोळ यांनी राजकारणाला समाजकार्याची जोड दिल्याने ग्रामीण भागातील विकासाला संधी मिळाली. सहकार, क्रीडा, शिक्षण आणि अन्य विविध क्षेत्रांत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ग्रामीण भागाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले, असे पवार म्हणाले. माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी सदानंद मोहोळ यांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, सदानंद मोहोळ हे एक उत्कृष्ट गोलंदाज होते आणि त्यांची खिलाडूवृत्ती वाखाणण्याजोगी होती. क्रिकेटमध्ये ते अजातशत्रू म्हणून ओळखले जात होते. माजी खासदार अशोक मोहोळ यांनी पुतळे उभारण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. ते म्हणाले की, मामासाहेब मोहोळ आणि सदानंद मोहोळ यांच्या कार्याचा आदर्श नव्या पिढीसमोर राहावा, या उद्देशाने हे पुतळे बसविण्यात आले आहेत. स्वर्गीय सदानंद मोहोळ सभागृहात येथील विद्यार्थ्यांना विविध खेळांच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास बनसुडे यांनी केले. खजिनदार दिलीप बराटे यांनी प्रास्ताविक केले, तर सचिव बाळासाहेब गांजवे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed