बारावीनंतर कोणता रोजगारक्षम अभ्यासक्रम करता येईल, यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन:ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाच्या चौथ्या ‘ब्रिज कोर्स’चा उत्साहात झाला समारोप‎

0
240_177719901369ede7a568b6b_brijlalbiani.jpg




प्रतिनिधी । अमरावती विद्यार्थ्यांना १२ वी नंतर नेमका कोणता रोजगारक्षम अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, दहावीनंतर ११ व १२ वीची तयारी नेमकी कशी करायची, तयारी करताना सद्सदविवेक जागृत कसा ठेवायचा, उत्तम रोजगारक्षम अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवण्यासाठी १२ वीच्या परीक्षेतील किमान ८० टक्के गुण आणि ९० टक्क्यांच्या वर जेईई, नीटमध्ये कसे पर्सेंटाईल ठेवायचे यासह ११ वीच्या विषयांबाबत सुमारे २५० विद्यार्थ्यांना ब्रिज कोर्समध्ये उत्स्फूर्तपणे विविध विषयांचे शिक्षक व तज्ज्ञांनी मार्गदर्शन केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. श्री ब्रिजलाल बियाणी शिक्षा समितीद्वारे संचालित, ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या ‘ब्रिज कोर्स’चा समारोप शनिवार १८ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात झाला. १ ते १८ एप्रिल या कालावधीत आयोजित या उपक्रमास विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी अध्यक्ष ॲड. अशोक राठी हे उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून लोणावळा येथील मनशक्ती केंद्राचे जीवनदायी साधक सुहास गुधाटे यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक धोटे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, ‘ब्रिज कोर्स’चे हे सलग चौथे वर्ष असून यंदाचे आयोजन आतापर्यंतचे सर्वाधिक यशस्वी ठरले आहे. या कोर्ससाठी २५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ९६ विद्यार्थ्यांनी हा १५ दिवसीय कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केला. या कालावधीत विद्यार्थ्यांना विज्ञान व वाणिज्य शाखेतील मूलभूत विषयांबरोबरच ‘एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज (इसीए)’ अंतर्गत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांना विद्यार्थी व पालक दोघांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. यानंतर अध्यक्षांच्या हस्ते विशेष अतिथी सुहास गुधाटे यांचा सत्कार करण्यात आला. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाची योग्य पद्धत, मानसिक ताकद वृद्धिंगत करण्याचे महत्त्व आणि जीवनातील आमिषांना बळी न पडता स्वप्नपूर्ती करण्याचे आवाहन केले. तसेच मनशक्ती केंद्राच्या कार्यशाळा व साहित्य विद्यार्थ्यांसाठी कसे उपयुक्त ठरू शकते, याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर ब्रिज कोर्स यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. यावर्षीच्या ब्रिज कोर्सचे विशेष आकर्षण ठरलेल्या ‘लाईव्ह बँक डेमो मॉडेल’ निर्मितीत सहभाग घेतलेल्या इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात ॲड. श्री अशोक राठी यांनी सुहास गुधाटे यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थ्यांनी व पालकांनी अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांच्या क्षमता व आवड लक्षात घेऊन त्यांचे भविष्य घडविण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच ब्रिज कोर्स यशस्वी करण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्व शिक्षकांचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था सदैव कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सीताराम राठी तसेच ब्रिज कोर्सचे संयोजक वैशाली वानखडे, योगिता बनसोडे आणि सूरज हेरे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज हेरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वैशाली वानखडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनीष महाजन, मिलींद संगई, दरेकर, सचिन पवार, गोपाल ढोले व बजाज यांचे विशेष सहकार्य लाभले. या समारंभाला उपस्थित असलेल्या पालकांनी संपूर्ण आयोजनाचे मनःपूर्वक कौतुक केले. शैक्षणिक प्रवासाला दिशा देणार ब्रिज कोर्स कार्यक्रमादरम्यान स्वरा भुसकडे, जाई सूर्यवंशी, तनिष्का मुनोत, झील भाटिया आणि ओजस्वी मालोकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ब्रिज कोर्समुळे झालेला शैक्षणिक व वैयक्तिक विकास अधोरेखित करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. पालक प्रतिनिधी म्हणून प्यारेलाल सूर्यवंशी यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत प्राचार्य डॉ. दीपक धोटे यांचे विशेष आभार मानले, तर सपना मशिदकर यांनी या कोर्समुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला महत्त्व पूर्ण दिशा मिळेल, असे मत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed