NDPS प्रकरणातील फरार गॅंगस्टर नांदेडमध्ये अटक; नांदेड व पंजाब पोलिसांची संयुक्त कारवाई
नांदेड (प्रतिनिधी) – NDPS प्रकरणात फरार असलेल्या गॅंगस्टर आरोपीला नांदेड पोलिसांनी पंजाब पोलिसांच्या मदतीने अटक करण्यात यश मिळवले आहे. या संयुक्त कारवाईमुळे मोठा गुन्हेगार जेरबंद झाला असून पोलिस दलाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वजिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद ढोके, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच खंडणी विरोधी पथकातील अधिकाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. पंजाब राज्यातील श्री मुक्तसर साहेब येथील सीआयए पथकाच्या अधिकाऱ्यांचाही या ऑपरेशनमध्ये सहभाग होता. यादवसिंह उर्फ याड (रा. यांबेखेडा, ता. मलोट, जि. श्री मुक्तसर साहेब, पंजाब) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी NDPS अंतर्गत गुन्हा क्र. 21/2019 (कलम 21, 25, 29) मध्ये फरार होता. त्याच्यावर एकूण 11 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे नांदेड शहरातील गुरुद्वारा चौकाजवळ सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपीला नांदेड न्यायालयात हजर करण्यात आले असता चार दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली होती. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला पंजाब येथे रवाना करण्यात आले. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी संपूर्ण पथकाचे कौतुक केले आहे.
Post Views: 453
