राजापेठेत व्यापारी संकुलाच्या जागेवर महापालिकेचा कचरा डेपो:हमरस्त्यावर दुर्गंधी; नागरिक, नगरसेवकांचा तीव्र विरोध
![]()
महापालिका प्रशासनाने राजापेठ येथे नवीन कचरा डेपो सुरू केला आहे. अमरावती शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जागेवर व्यापारी संकुल उभारून पालिकेला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळू शकला असता. मात्र, त्याच जागेवर कचरा डेपो सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा नवीन कचरा डेपो राजापेठ पोलीस ठाणे, मनपाचे व्यापारी संकुल आणि झोन कार्यालयाच्या अगदी मागे अमरावती-बडनेरा महामार्गावर उघडण्यात आला आहे. पूर्वी या ठिकाणी अतिक्रमण हटवताना जप्त केलेली सामग्री ठेवली जात असे. आता या जागेला ‘कचरा संकलन केंद्र’ असे नाव देऊन येथे एक मोठा रॅम्प बांधण्यात आला आहे. शहरातील कचरा गोळा करून आणणारी सुमारे आठ ते दहा वाहने आपला कचरा येथे उभ्या असलेल्या मोठ्या ट्रकमध्ये दाबून भरतात, जो नंतर कंपोस्ट डेपोवर नेला जातो. कचरा गाड्या आत नेण्यासाठी अमरावती-बडनेरा महामार्गावरील राजापेठ पोलीस ठाण्यापासून वळावे लागते. हा मार्ग नेहमी वर्दळीचा असतो आणि बाजूलाच शाळा असल्याने वाहतुकीची कोंडी होते. मनपाच्या झोन ऑफिसमध्ये आणि शेजारच्या हॉटेलमध्ये ये-जा करणाऱ्यांनाही याचा त्रास होतो. कचरा गाड्यांमधून कचरा मुख्य रस्त्यावर सांडतो, ज्यामुळे घाण साचते आणि नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. त्यामुळे हा कचरा डेपो तात्काळ बंद करण्याची मागणी जोर धरत आहे. स्थानिक नगरसेवकांनीही या कचरा डेपोला विरोध दर्शवला आहे. अंबापेठ वार्डाचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे सदस्य मिलिंद बांबल यांनी स्थायी समितीसमोर हा विषय मांडला आहे. विनोद तानवैस यांच्या अनुमोदनाने दाखल केलेल्या या प्रस्तावावर आगामी सभेत चर्चा केली जाणार आहे. तारासाहेब बगीचा परिसरातील नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने बांबल यांनी हे पाऊल उचलले आहे.
