अहिल्यानगर शहरात ‘इव्हनिंग वेडिंग’चा ट्रेंड जोरात!:दुपारच्या लग्नाला पाहुणे कमी, बहुतांश कार्यालयांत वाढली सायंकाळची बुकींग
![]()
वऱ्हाडी मंडळी आजारी पडू नयेत आणि त्यांची गैरसोय टाळावी, यासाठी आता दुपारऐवजी सायंकाळी विवाह सोहळे करण्याचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहरातील सुमारे ४० मंगल कार्यालयांमध्ये दिवसाऐवजी सायंकाळच्या ‘स्लॉट’ला पसंती मिळत असून, अशा बुकिंगवर नागरिकांचा भर आहे. उष्णतेचा सर्वाधिक फटका सध्या लग्नसोहळ्यांना बसत आहे.कडाक्याच्या उन्हात मंगल कार्यालयापर्यंत पोहोचणे पाहुण्यांसाठी तापदायक ठरत असल्याने, अनेक कुटुंबे सायंकाळचा मुहूर्त साधत आहेत. सायंकाळी ५ नंतर वातावरणात थोडा गारवा निर्माण होतो, परिणामी पाहुण्यांची उपस्थिती वाढते आणि उत्साहही टिकून राहतो. शिवाय, सायंकाळच्या वेळी केलेली रोषणाई आणि सजावट लग्नाचा आनंद द्विगुणित करत असल्याने तरुणाईचीही याला पसंती मिळत आहे. उन्हामुळे त्वेचेच्या आजारात वाढ दुपारी तापमानाचा पारा ४० अंशांपर्यंत पोहोचत असल्याने डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना गरम वाऱ्यांमुळे त्वचेचे विकार आणि डोकेदुखीचा त्रास जाणवतो. बहुतांश मंगल कार्यालयांमध्ये एसी किंवा कुलरची सोय असूनही दुपारची उष्णता असह्य ठरते; त्यामुळे पाहुणे सोहळ्याला कमी वेळ थांबून लवकर निघून जातात. “वाढत्या उष्णतेमुळे ग्राहक आता सायंकाळच्या वेळेसाठी अधिक चौकशी करत आहेत. दुपारी पाहुण्यांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्हीही संध्याकाळचे नियोजन सुचवत आहोत. शहरात संध्याकाळच्या लग्नांचे बुकिंग गेल्या वर्षाच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढले आहे.” – अरुण कचरे, मंगल कार्यालय मालक. यंदाचे शुभमुहूर्त : एप्रिल : २६, २७, २८, २९ व ३०. मे : १, ३, ५, ६, ७, ८, १३ व १७
