महाराष्ट्रावर सूर्य कोपला!:परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा मृत्यू, अकोल्यात पारा 46 वर जाण्याचा इशारा; अनेक शहरांत रस्ते सामसूम

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-26t16_1777202328.png




महाराष्ट्रावर सध्या सूर्य कोपल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक शहरे उष्णतेच्या तडाख्याने अक्षरशः होरपळून निघत आहेत. विदर्भ व मराठवाड्यासह अनेक शहरांत तापमानाने उच्चांक गाठला आहे. त्यामुळे दुपारपूर्वीच रस्ते सामसूम झाल्याचे दिसून येत आहे. परभणीत उष्माघाताने एका व्यक्तीचा बळी गेला आहे. तर अकोल्यात पारा तब्बल 46 अंशांवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या तापमानामुळे काही ठिकाणी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. गत काही दिवसांपासून राज्यातील शहरांच्या तापमानात भयंकर वाढ होताना दिसून येत आहे. विशेषतः अकोल्यातील तापमानात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानामुळे अकोला हे जगातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या शहरांपैकी एक ठरत आहे. गत 21 एप्रिल रोजी अकोल्यात 43.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यानंतर 22 एप्रिल रोजी 43.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यानंतर 23 एप्रिल, 24 एप्रिल व 25 एप्रिल रोजी अनुक्रमे 44.3, 45 व 45.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. दिवसागणिक वाढणाऱ्या या तापमानामुळे नागरीक पुरते हैरान झालेत. परभणीत उष्माघाताने एकाचा मृत्यू परभणीत उष्माघातामुळे शिवाजी बबन कांबळे नामक 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कांबळे हे नाशिकहून परभणीला आपल्या भावाकडे आले होते. दिवसभर उन्हात फिरल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या भावाच्या फिर्यादीनुसार, शहरातील नानलपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेवर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लातूर जिल्ह्यातही उष्माघाताचे 2 बळी लातूर जिल्ह्यातील गोंद्री इथे उष्माघाताने एका 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. शिया गोरे असे बाळाचे नाव आहे. उष्माघाताने मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. यापूर्वी औराद शहाजनी येथील वृद्ध शेतकरी लक्ष्मण भंडारे यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. जळगावचे तापमानही 43 च्या पुढे जळगाव शहरातील तापमानही रविवारी 43.3 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. ही यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद आहे. वाढत्या तापमानामुळे जळगावकर उकाड्याने हैरान झालेत. यावर उपाय म्हणून महापालिकेने शहरातील प्रमुख चौकांमध्ये टँकरद्वारे पाणी मारण्याची मोहीम हाती घेतली आहे. यामुळे नागरिकांना थोडासा मिळत आहे. प्रशासनाने नागरिकांना उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत पारा 39 अंश सेल्सिअसवर मुंबईचा पाराही आज 39 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. हवामान विभागाने रविवारी व सोमवारी मुंबई शहर व उपनगरांत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्यानुसार, आज मुंबईत उन्हाच्या पाऱ्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून आली. या उन्हापासून वाचण्यासाठी मुंबईकरांनी घरी राहण्यास पसंती दिली. अमरावतीमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावतीत झाली आहे. शनिवारी अमरावतीचे कमाल तापमान 45.6 अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आले. चिंतेची बाब म्हणजे हवामान खात्याने पुढील 2 दिवस शहरात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नंदूरबार जिल्हा 41 अंश सेल्सिअसवर आदिवासीबहुल नंदरबार जिल्हाही यंदाच्या उन्हाळ्यात चांगलाच तापला आहे. जिल्ह्यात 41 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. कमी आर्द्रतेमुळे जिल्ह्यातील उकाड्याची तीव्रता वाढली आहे. त्याचा मोठा त्रास नागरिकांना होत आहे. दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. पुढील महिन्यात जिल्ह्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नाशिकलाही उन्हाचा जोरदार तडाखा नाशिक जिल्ह्यातील थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातही यंदा उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. लासलगाव येथे गेल्या 13 एप्रिलपासून कमाल तापमान सतत 40 अंश सेल्सिअसच्या वर राहात आहे. येथे आज तापमानाने 42.6 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला. नाशिकच्या मालेगावातही उन्हाचा कडाका वाढला आहे. येथे आज 43.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. खाली वाचा इतर काही जिल्ह्यांतील तापमान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed