सरकीचे पोते असलेला ट्रक उलटल्याने क्लिनर जखमी:मोर्शीजवळ दोन अपघात; अन्य एका अपघातात दुचाकीस्वार गंभीर
![]()
मोर्शी ते अमरावती रोडवरील मडघे मंगल कार्यालयासमोर आज, शनिवारी सकाळी झालेल्या रस्ता अपघातात आयशर ट्रक उलटला. या अपघातात सरकी रस्त्यावर विखुरली. क्लिनरलाही जीव वाचविताना पायात जखम झाली. दुसऱ्या एका घटनेत मोर्शी-चांदूरबाजार रोडवरील रेल्वे गेटजवळच्या गतिरोधकावर वाहन अनियंत्रित झाल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावतीहून छत्तीसगढ येथे सरकीचे पोते असलेला आयशर ट्रक उलटून ट्रकची कॅबिन पूर्णतः चकनाचुर झाली. कॅबीनच्या काचा फुटल्या व ट्रक मध्ये असलेला माल अस्ताव्यस्त पसरल्यामुळे मोठे नुकसान झाले. या अपघातात ट्रकच्या क्लीनरचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. सुदैवाने प्राणहानी टाळली. सदर घटना आज, शनिवार, २५ एप्रिलला सकाळी ७.३० वाजताचे सुमारास घडली. ट्रक क्र.आर जे २१ जी सी १९२९ च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने मडघे मंगल कार्यालयासमोर रोडच्या बाजूला तो उलटला. या ट्रकची धडक दुसऱ्या वाहनाला लागून किंवा तो खड्ड्यात ट्रक पडून मोठी घटना घडली असती. मात्र सुदैवाने तसे न झाल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात ट्रक चालकास किरकोळ मार लागला असून ट्रकचा क्लीनर रघुवीर शेखावत वय २८ वर्षे, रा. नागोर (राजस्थान) याचा पायाला दुखापत झाली. त्याला लगेच येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.प्रथमोपचारानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. उलटलेला ट्रक क्रेनच्या साह्याने उभा करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण चिंचोळे पुढील तपास करीत आहे. दुसरा अपघात मोर्शी ते चांदूरबाजार रोडवर असलेल्या रेल्वे गेट जवळील स्पीड ब्रेकर्सजवळ झाला. या अपघातात मोटर सायकलस्वार गंभीररित्या जखमी झाला असून त्याला उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथून गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी उशीरा रात्री झाला. विघ्नेश्वर सर्वानंद ठाकूर वय २७ वर्ष रा. डींडीगुल (तामिळनाडू) असे जखमीचे नाव आहे. बोरिंगचे काम करणारा हा मजूर काही कामानिमित्त मोर्शी येथून चांदूरबाजारकडे आपली मोटरसायकल क्र.एम एच २७ डी आर ६७५७ ने जात होता. दरम्यान रेल्वे क्रॉसिंगजवळील गतिरोधकावर मोटर सायकल आदळून त्याचा अपघात झाला. विघ्नेश्वर याच्या डोक्याला जबर मार बसल्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाला. या घटनेची माहिती मोर्शी पोलिस स्टेशनला दूरध्वनीवरून प्राप्त झाली. लगेच ठाणेदार राहुल आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण चिंचोले यांनी मदत केली. मोर्शी, वरुड तालुक्यात बोरिंगची कामे करणारे अनेक मजूर आहेत. छत्तीसगढ, मध्यप्रदेशातील मूळ रहिवासी असलेले हे मजूर येथे भाडे तत्वावर राहतात. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बोरवेलची अनेक कामे सुरु आहेत. या कामासाठी हे मजूर कुशल कारागिर म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे ट्रॅक्टर व दुचाकीसारखी दळणवळणाची साधने आहेत. दिवसभर बोरिंगचे काम आटोपून उशीरा रात्री काही मजूर आपापल्या रहिवासाच्या ठिकाणी परततात. रोजगारासाठी त्यांची ही भ्रमंती सुरु आहे. परंतु त्यांनी मात्र स्वत:ला जपावे, असा यंत्रणेचा सल्ला आहे. रोजगाराच्या शोधात सुरु असते भ्रमंती
