पूजेच्या ताटात 2 लिंबांना टाचण्या!:अमोल मिटकरींचा खळबळजनक दावा; अजित पवारांच्या प्रतिमेजवळील प्रकार
![]()
28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत असताना, त्यांचे लिअरजेट विमान खराब हवामान आणि दाट धुक्यामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन कोसळले. या अत्यंत दुर्दैवी घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली असून, सध्या या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. अपघाताच्या चौकशीदरम्यान आता या प्रकरणाला एक धक्कादायक वळण मिळाले आहे. या दुर्घटनेमागे काळी जादू आणि अघोरी पूजा यांचा संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला जात असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याच संदर्भात अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत काही खळबळजनक दावे केले आहेत. त्यांच्या या पोस्टमुळे विमान अपघाताबाबतचे संशयाचे जाळे अधिक गडद झाले असून, राजकीय वर्तुळात आता विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हणाले, काल रात्री दादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या, हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रकार?? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अजित पवार यांच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी एक खळबळजनक दावा केला असून, अपघाताच्या आदल्या दिवशी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या बांधकाम साइटवर अघोरी पूजा करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले असून, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील या संपूर्ण घटनेमागे एखादा अघोरी प्रकार किंवा मोठा कट असण्याची शक्यता वर्तवली आहे. या धक्कादायक आरोपांमुळे परिसरात खळबळ उडाली असून, रोहित पवार यांनी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची आग्रही मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, अजित पवार विमान अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज अद्याप का समोर आले नाहीत, असा संतप्त सवाल विचारला आहे. अशोक खरात किंवा परतवाडा यांसारख्या इतर प्रकरणांमधील फुटेज तातडीने उपलब्ध होतात, मग या दुर्घटनेबाबतच विलंब का केला जात आहे, अशी विचारणा त्यांनी केली. तसेच, 15 दिवसांत ब्लॅक बॉक्सचा डेटा जाहीर करण्याचे आश्वासन देऊनही 4 महिने उलटूनही तो का समोर आला नाही आणि तो डेटा अजूनही बारामती पोलीस ठाण्यातच का पडून आहे, असा दावा त्यांनी बारामतीतील स्थानिक नागरिकांशी केलेल्या चर्चेच्या आधारे केला आहे.
