जिल्हा परिषदेच्या 67 शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती:समुपदेशनाद्वारे प्रक्रिया पूर्ण, सीईओ गांधींच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी




अमरावती जिल्हा परिषदेतील ६७ शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्यात आली आहे. समुपदेशनाद्वारे ही प्रक्रिया नुकतीच पार पडली असून, या शिक्षकांवर आता केंद्रप्रमुखांची नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ही पदोन्नती प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयात दाखल विशेष अनुमती याचिका तसेच संबंधित सर्व न्यायालयीन प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पार पाडण्यात आली. जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश मुगल, उपशिक्षणाधिकारी किशन फोले आणि अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व गुणवत्ताधारित पद्धतीने पूर्ण झाली. या पदोन्नती प्रक्रियेसाठी एकूण ९७ पात्र शिक्षकांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी ६७ शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर पदोन्नती मिळाली. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ (सुधारणा २०२५) परिशिष्ट चार (भाग-२) मधील अ.क्र. (८) (अ) अन्वये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. एकूण ७१ केंद्रप्रमुखांची रिक्त पदे होती. त्यापैकी ६६ उमेदवारांनी पदोन्नती स्वीकारली, तर ४ उमेदवारांनी पदोन्नती नाकारली. एक उमेदवार अपात्र असल्यामुळे गैरहजर राहिला. याशिवाय, दिव्यांग (अस्थिव्यंग) प्रवर्गातील एका उमेदवारालाही पदोन्नती देण्यात आली. सीईओ सत्यम गांधी यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने ही प्रक्रिया राबविली. शिक्षण विभागातील सहाय्यक प्रशासन अधिकारी संजय मुंद्रे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंकज गुल्हाने, विजय कविटकर, वरिष्ठ सहाय्यक राहुल काळमेघ, शरद शहाकार, विजय राऊत तसेच कनिष्ठ सहाय्यक अनिकेत हुरडे यांनी ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *