अशोक खरातच्या नव्या कारनाम्याने खळबळ:अवतारपूजेच्या नावाखाली 8 कोटींची फसवणूक; आई-वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवली
![]()
भोंदूगिरी आणि विविध गंभीर आरोपांमुळे आधीच चर्चेत असलेल्या अशोक खरात याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. एका चार्टर्ड अकाउंटंटची 8 कोटी 76 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला असून या प्रकरणी नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात नवीन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खरातच्या कारवायांबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित सीए ललित पोफळे हे खरातच्या ट्रस्टशी संबंधित होते आणि ते विश्वस्त म्हणून काम पाहत होते. त्यामुळे ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांची त्यांना सखोल माहिती होती. याच ओळखीचा फायदा घेत खरातने त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या मृत्यूचा योग असल्याचे सांगून घाबरवले. या भीतीतून सुटका करण्यासाठी अवतारपूजा, करण्याचा सल्ला देत त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने कोट्यवधी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोफळे यांची याआधी पोलिसांनी चौकशी केली असता, खरातच्या आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती उघड झाली होती. ट्रस्टमधील आर्थिक हालचाली आणि पैशांचा वापर याबाबत अधिक तपास सुरू असून, या नव्या गुन्ह्यामुळे संपूर्ण रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, अशोक खरातविरोधातील गुन्ह्यांची मालिका वाढतच चालली आहे. आतापर्यंत त्याच्यावर लैंगिक शोषणाचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 9 गुन्हे नोंदवले गेले आहेत. धर्म आणि अध्यात्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करणे आणि महिलांचे शोषण करणे, हीच त्याची कार्यपद्धती असल्याचे तपासात समोर आले आहे. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक गतीने सुरू केला आहे. सध्या सहाव्या गुन्ह्यात ताबा या सर्व प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर खरातला न्यायालयात हजर करण्यात आले होते. महिला अत्याचाराच्या सहाव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने त्याचा ताबा घेतला असून, न्यायालयाने त्याला 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालयात एका महिलेला गुंगीचे पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप त्याच्यावर आहे. सरकारी वकिलांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली असताना, खरातच्या वकिलांनी त्याला विरोध केला होता. मात्र, सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडी मंजूर केली. आता या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक तपशील समोर येतात आणि तपासात कोणती नवीन माहिती उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
