रामदासांच्या नव्हे, मग कोणाच्या भेटीमुळे शिवरायांमध्ये निर्माण झाले वैराग्य:शिवाजी महाराज कसे वळले स्वराज्याकडे?; जिजाऊंचे प्रयत्न ते तुकारामांची भेट, वाचाच…!
![]()
‘छत्रपती वीर शिवाजी महाराज युद्ध करून थकले. एकेदिवशी ते स्वामी समर्थ रामदासांकडे गेले. त्यांनी आपला मुकुट उतरवला आणि म्हणाले, आम्ही खूप लढाया लढल्या. आता आम्हाला पुन्हा लढायचे नाही. एक मोठी दया करा. हा मुकुट तुम्ही सांभाळा. राजपद तुम्ही सांभाळा. तुमच्या आज्ञेवरच आम्ही चाललो. आता आम्हाला पुढे चालवत नाही. आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आम्ही खूप थकलो आहोत. आम्हाला आता विश्रांती हवी आहे. आता काही दिवस आम्हाला काहीही करायचे नाही,’ असे वक्तव्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी नागपूरमध्ये एका कार्यक्रमात केले. त्यामुळे बागेश्वर बाबा पुन्हा एकदा वादात सापडलेत. खरे तर जगद्गुरू संत तुकारामांना भेटल्यानंतर त्यांच्यातील वैराग्यवृत्तीने छत्रपती शिवाजी महाराजांना मोहित केले होते. शिवरायांमध्ये विरक्ती निर्माण झाली होती. तेव्हा जिजाऊ माँसाहेबांनी संत तुकारामांची भेट घेतली. त्यांना शिवरायांबद्दल सारे सांगितले. सोबतच शिवरायांमधील विरक्ती नाहीशी करून त्यांना स्वराज्याच्या ध्येयाकडे वळवावे, असे साकडे घातले. हे सारे जे घडले ते संत तुकाराम आणि शिवाजी महाराजांमधील आध्यात्मिक नात्याच्या अंगानेही खूप अद्भूत असेच आहे. हे सारे कसे आणि काय घडले होते, ते जाणून घेऊयात… ‘तुकारामबावांचे चरित्र’ या ग्रंथात चरित्रकार कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी या प्रकरणावर सविस्तर प्रकाश टाकला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हे चरित्र प्रसिद्ध केले असून, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस त्याचे संपादक आहेत. तर प्रस्तावना ज्येष्ठ समीक्षक रणधीर शिंदे यांची आहे. संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली भेट साऱ्यांना मंत्रमुग्ध करणारी अशीच आहे. तुकारामांचे अभंग ब्राह्मणांनी इंद्रायणीच्या पाण्यात बुडवले. मात्र, ते तेरा दिवसांनी वर आले. या अभूतपूर्व घटनेची वार्ता सगळीकडे पसरलेली. शिवाजी महाराजांच्या कानीही गेलेली. तुकोबारायांची निःसीम वैराग्यवृत्ती, प्रासादिक अभंगवाणी, सर्वांना आपलेसे करणारे बोल आणि मोहक वकृत्वामुळे त्यांचे कीर्तन रंगत असे. पंढरपूरच्या प्रमुख वारकऱ्यांत त्यांची गणना होऊ लागलेली. शिवाजी महाराजांच्या एका पुराणिकाचा कोंडभट नावाचा शागीर्द होता. तो तुकारामांच्या दर्शनाला गेलेला. त्याला प्रसाद म्हणून दिलेल्या नारळात जडजवाहिरे सापडली. तेव्हापासून तो तुकारामांचा शिष्य झाला. अशा नाना बातम्या शिवाजी महाराजांपर्यंत पोहचत होत्या. तुकारामांसारखा विठ्ठल भक्त दुसरा नाही, अशी कीर्ती शिवाजी महाराजांपर्यंत पोहचलेली. त्यामुळे त्यांना तुकारामांच्या दर्शनाची आस लागली. त्यांनी एक पत्र तुकारामांच्या नावे लिहिले. कारकुनाबरोबर घोडा, छत्री वगैरे लवाजमा दिला. कारकुनाने हे पत्र तुकारामांना दिले. तेव्हा तुकारामांनी आठ अभंग लिहून त्यांना उत्तर दिले. त्यातला एक अभंग असा… दिवट्या छत्री घोडे। हे तों बऱ्यांत न पडे ।।१।। आतां येथे पंढरिराया । मज गोविसी कासया ।।२।। मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा ।।३।। तुका म्हणे देवा । माझे सोडवणे धावा ।।४।।
तुकारामांची वैराग्यवृत्ती या अभंगातून व्यक्त होते. कशाचाही मोह नाही. लीनता, सरळता, निरपेक्षता, प्रेमळता हे सारे गुण त्यातून प्रकट होतात. आपले आचरण कायम शुद्ध राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. तुकारामांची ही निस्पृहवृत्ती शिवाजी महाराजांना प्रचंड भावली. ते स्वतः लोहगाव येथे तुकारामांचे कीर्तन ऐकायला आले. राजांनी तुकारामांना सांष्टांग दंडवत घातला. कपाळाला बुक्का लावला. गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या. फुलांच्या माळा घातल्या. पुढे वस्त्रे, अलंकार, सोन्याच्या नाण्यांनी भरलेले ताट ठेवले. मात्र, तुकारामांनी यातले काहीही स्वीकारले नाही. त्यावेळी त्यांनी सात अभंग म्हटले. त्यातला एक असा… मुंगी आणि राव । आम्हा सारखाचि जीव ।।१।। गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ।।२।। सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्तें ।।३।। तुका म्हणे आले । घरा वैकुंठ सगळे ।।४।। संत तुकारामांच्या या वृत्तीने राजे आणखीच मोहित झाले. त्यांनी आलेले सोनेनाणे तिथेच वाटून टाकले. तुकारामांच्या कीर्तनाचा आनंद घेतला. त्यांच्या अतिशय गोड आणि विद्वत प्रचुर वाणीचे ते वेडे झाले. कीर्तन संपल्यानंतर मुक्कामी गेले. शिवाजी महाराजांनी एकांतवास पत्करला. तुकारामांच्या उपदेशाचे मनन, चिंतन सुरू केले. त्यांच्या ठायी वैराग्य वृत्ती उत्पन्न झाली. त्यांना असे पाहून अष्टप्रधान मंडळी चिंतातुर झाली. त्यांनी जिजाऊस पत्र लिहून कळवले. त्या सुद्धा लोहगावास आल्या. त्यांनी तुकारामांची भेट घेतली. त्यांना सारे कथन केले. आपल्याला एकुलता एक मुलगा आहे. स्वराज्य हेच त्याचे ध्येय आहे. मात्र, तो तुमचे कीर्तन ऐकून आता विरक्त झाल्याचे सांगितले. तो तुमचे कीर्तन ऐकायला येतो. त्याला काही बोध करा, असे साकडेहे घातले.
संत तुकारामांचे त्या रात्री पुन्हा कीर्तन सुरू झाले. जिजाऊ त्याठिकाणी होत्याच. सोबतच शिवाजी महाराजाही आलेले. त्यावेळी तुकाराम महाराजांनी स्वमोक्षासाठी संसार त्याग करण्यात काहीच हाशील नाही. फक्त संसारात नीतीने वागावे. परोपकार करावा. हरिभक्ती करावी, असे आवाहन केले. राजा सदाचारी असावा, त्याने लोककल्याण करावे, प्रजापालन कसे करावे, या साऱ्यावर बोलले. आणि शिवाजी महाराजांची वैराग्य वृत्ती पुन्हा स्वराज्याच्या ध्येयाकडे आली. तुकारामांचे वकृत्व होतेच असे. खरे तर शिवाजी महाराजांनी संत तुकारामांना जहागिरी देण्यासाठी एक सनद तयार केली होती. तुकारामांचे कीर्तन झाल्याझाल्या ती सनद त्यांना द्यायची होती. मात्र, तुकाराम अचानक नाहीसे झाले. तुकारामाचा शेवटचा मुलगा नारायण. हा प्रचंड बुद्धिमान. सोबत तुकारामांची भक्ती आणि वैराग्य त्यांच्यात उतरलेले. ते नेहमी हरिभजनात रमत. तुकोबारायांचे सारे अभंग त्यांना तोंडपाठ होते. त्यांचे कीर्तन ऐकायला पंचक्रोशी गोळा व्हायची. तुकारामांच्या वैकुंठगमनानंतरही एकदा शिवाजी महाराज देहूला आलेले. त्यांनी तेथील विठोबाचे दर्शन घेतले. संत तुकारामांच्या घरची परिस्थिती कशी आहे, हे पाहण्यासाठी ते तुकोबारायांच्या घरीही आले. तेव्हा त्यांची नारायण यांची भेट झाली. त्यांची वृत्ती पाहून शिवाजी राजांना परमानंद झाला. त्यांनी संत तुकारामांना जाहागिरी देण्यासाठी तयार केलेली सनद पुढे त्यांचा मुलगा नारायण महाराजांच्या नावे करून दिली. हे उत्पन्न मिळाल्यापासून तुकारामांनी देहूत स्थापलेल्या विठोबाच्या मंदिराचा खर्च व तेथील वार्षिक समारंभ मोठ्या थाटाने होऊ लागला.
