जागतिक वसुंधरा दिनानिमित्त माती परीक्षण:महात्मा फुले महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचा उपक्रम, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
![]()
महात्मा फुले कला, वाणिज्य व सितारामजी चौधरी विज्ञान महाविद्यालय, वरुड येथील रसायनशास्त्र विभागाद्वारे दरवर्षी वेगवेगळे समाजाभिमुख उपक्रम राबवले जातात. रसायनशास्त्र व विज्ञान समाजासाठी किती उपयुक्त आहे, या विषयावर विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. यावर्षी विभागातील पदव्युत्तर रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतीमध्ये जाऊन वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे नमुने गोळा केले. त्यांची प्रयोगशाळेत सविस्तर चाचणी करून अभ्यास केला. त्या जमिनीतील पोषक तत्त्वे व जमिनीचे आरोग्य याबाबत सविस्तर तपशील तयार केला. विद्यार्थ्यांनी तपासलेल्या माती नमुन्यांचा तपशील जागतिक वसुंधरा दिनानिमित्त प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांना सुपूर्द केला. अशा प्रकारे केलेल्या माती परीक्षणामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या आरोग्याची खात्रीशीर व अचूक माहिती मिळाली. शेतजमिनीत असलेल्या कमी-जास्त पोषक तत्त्वांची माहिती अचूक मिळाल्यामुळे जमिनीची गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांना योग्य दिशा मिळाली. विद्यार्थ्यांनी तपासलेल्या नमुन्यांवरून जमिनीची व मातीची गुणवत्ता कशी वाढवता येईल, याविषयी सखोल मार्गदर्शन केले. कुठल्या सेंद्रिय खताचा कमी-जास्त वापर करता येईल, याबाबतही त्यांनी माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झाला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या विनामूल्य सेवेबद्दल शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आभारही व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्ही. हांडे महाविद्यालयातील प्रत्येक विज्ञान विभागाला समाजाला उपयोगी पडतील असे विविध उपक्रम राबवण्यासाठी सतत मार्गदर्शन करतात. या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ. आर. पी. गणोरकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या माती परीक्षण उपक्रमाचे समन्वयक म्हणून रसायनशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. वैभव एन. गुल्हाने यांनी नियोजनबद्ध आखणी केली. विद्यार्थ्यांकडून हा उपक्रम पूर्ण करून घेतला. या उपक्रमासाठी रसायनशास्त्राच्या पदव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेतले. शेतकऱ्यांना व समाजाला रसायनशास्त्राची उपयुक्तता सिद्ध करून दाखवली. याप्रसंगी रसायनशास्त्राच्या प्राध्यापिका डॉ. प्रियंका बेलसरे, प्रा. डॉ. अतुल वंजारी, प्रा. सतीश कोलटेके, प्राध्यापिका साक्षी हेटे, प्राध्यापिका दर्शना बोरकर व इतर विद्यार्थी उपस्थित होते.
